Join us

​फूल और काटे फेम मधू आरंभ या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 12:43 IST

मधूने फूल और काटे, रोजा, दिलजले यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नव्वदीच्या दशकात तिचे अनेक चित्रपट गाजले आहेत. पण ...

मधूने फूल और काटे, रोजा, दिलजले यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नव्वदीच्या दशकात तिचे अनेक चित्रपट गाजले आहेत. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये तिने कोणत्याही हिंदी चित्रपटात काम केले नाही. मात्र ती आजही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिचे अनेक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजत आहेत. अनेक वर्षं मोठ्या पडद्यावर काम केल्यानंतर मधू आता छोट्या पडद्याकडे वळणार आहे. आरंभ या मालिकेत तनुजा, रजनीश दुग्गल, कार्तिका नायर प्रमुख भूमिका साकारणार आहेत. बाहुबली 2 या चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद ही मालिका सादर करणार असून ही एक भव्य ऐतिहासिक मालिका आहे. या मालिकेत दोन संस्कृतींमधील संघर्षाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोन्ही संस्कृती आपापल्या अस्तित्वासाठी एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. भारतीय उपखंडावर द्रवीड संस्कृतीचे अधिराज्य होते. त्या काळातील ही कथा आहे.आरंभ या मालिकेत मधू झळकणार असून ती द्रवीड संस्कृतीची असल्याचे दाखवण्यात येणार आहे. ती या मालिकेत एका राणीची भूमिका साकारत असून तिच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी ती युद्धात देखील सहभागी होणार आहे. या मालिकेत ती काही अॅक्शन दृश्ये करतानादेखील पाहायला मिळणार आहे. परमीत सेठीच्या मालिकेद्वारे मधू छोट्या पडद्यावर झळकणार होती. पण काही कारणास्तव ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली नाही. पण आरंभ या मालिकेद्वारे तिने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. मधूप्रमाणेच या मालिकेद्वारे तनुजा मुखर्जी छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. त्या या मालिकेत हाहुमा या द्रविडांच्या सर्वोच्च धार्मिक गुरूची भूमिका साकारणार आहेत.