तलाश फेम सुहास आहुजा पुन्हा अडकणार विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:40 IST
कट्टी-बट्टी, तलाश यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता सुहास आहुजा सध्या पीओडब्ल्यू-बंदी युद्ध के या मालिकेत सलीम ही भूमिका साकारत आहे. ...
तलाश फेम सुहास आहुजा पुन्हा अडकणार विवाहबंधनात
कट्टी-बट्टी, तलाश यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता सुहास आहुजा सध्या पीओडब्ल्यू-बंदी युद्ध के या मालिकेत सलीम ही भूमिका साकारत आहे. या त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. सुहासच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. सुहास लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.सुहासचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू आहे आणि आता आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्याचा निर्णय सुहासने घेतला आहे. सुहास श्रुती गुप्ते या आपल्या प्रेयसीसोबत 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला लग्न करणार आहे. याविषयी सुहास सांगतो, "व्हॅलेंटाईन डे हा प्रेमदिवस असल्याने अनेकजण या दिवशी लग्न करतात. त्यामुळे मीदेखील व्हॅलेंटाईन डेचे निमित्त साधून लग्न करत आहे असे अनेकांना वाटत आहे. पण हे अत्यंत चुकीचे आहे. हा एक शुभदिवस असून या दिवशी लग्नाचा खूप चांगला आहे असे आम्हाला सांगितले गेले असल्यामुळे आम्ही या दिवसाची लग्न करण्यासाठी निवड केली. मी आणि श्रुती गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहोत. दोन वर्षांच्या नात्यानंतर आता आम्ही लग्नबंधनात अडकायचे ठरवले आहे. माझी आणि श्रुतीची ओळख एका अभिनय कार्यशाळेच्या दरम्यान झाली. तिला पाहाताच मी तिच्या प्रेमात पडलो. तीच माझी भावी जीवनसाथी असल्याचे मला पहिल्या भेटीतच जाणवले. सुहासचे हे दुसरे लग्न असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री रत्नाबाली भट्टाचार्जीसोबत त्याचे लग्न झाले होते. रत्नाबालीने सोल्ड, ऑफशोअर यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. सुहासचा तलाश हा चित्रपट येण्यापूर्वीच त्याचे रत्नाबालीसोबत लग्न झाले होते.