Join us  

लॉकडाऊन १ महिन्याचा असो किंवा ६ महिन्यांचा गावातल्या प्रत्येकाच्या घरी पोहचणार जेवण, शोमधल्या स्पर्धकाला सोनू सूदचे वचन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 4:07 PM

काही दिवसांपूर्वीच सोनू सूदला कोरोनाची लागण झाली होती. पण स्वत: कोरोना पॉझिटीव्ह असूनही त्याची मदत थांबली नव्हती.

गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट आली आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) देवदूतासारखा स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी धावला. दिवसरात्र खपत त्याने हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवले. कोरोनाची पहिली लाट ओसरली. पण सोनू सूदच्या मदतीचा ओघ आटला नाहीच. जमेल त्या मार्गाने तो लोकांची मदत करत राहिला आणि सोनू लोकांसाठी ‘देव’ ठरला. आता त्सूनामी बनून आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेतही सोनू सूद रात्रंदिवस लोकांना मदत करतोय.

एका रिएलिटी शोच्या स्पर्धकाने लॉकडाऊन काळातली त्याची व्यथा सोनू सूदपुढे मांडली. सोनू सूदने नेहमी प्रमाणे क्षणाचाही विलंन न लावता गावातील प्रत्येकाच्या घरी जेवण पोहचणार असल्याचे आश्वासन या स्पर्धकाला दिले आहे. यावेळी लॉकडाऊन १ महिन्याचा असो किंवा ६ महिन्यांचा फरक पडत नाही. गावातल्या प्रत्येक कुटुंबाला जेवण मिळत राहणार याची जबाबदारी माझी म्हणत सोनू सूदने यावेळी सांगितले.

छोट्या पडदयावरील डान्स दिवाने सिझन ३ शोमध्ये सोनू सूदने हजेरी लावली होती. अभी मुझ मै कही या गाण्यावर स्पर्धकाने ठेका धरताच सोनू सूद भावूक झाला. स्पर्धकाचा परफॉर्मन्स पाहून त्याला इतके भरुन आले की, त्याच्या डोळ्यात पाणी आले. या शोमधला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच दरम्यान स्पर्धक सोनू सूदला लॉकडाऊनमुळे त्याच्या गावक-यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे याबद्दल सांगताना दिसतोय.

स्पर्धकाने सांगितले की, गावात छोट्याशा छोट्या गोष्टींसाठी गावक-यांना आज मुकावे लागत आहे. दोन वेळच्या जेवणही लोकांना मिळत नाही. जेवणासाठी प्रत्येकाचे हाल होत आहेत. उदयच्या गावात ओढावलेली परिस्थिती पाहून सोनू सूदही भावूक झाला आणि उदयला गावात आजपासून कोणीच उपाशी पोटी राहणार नाही. प्रत्येकाच्या घरात राशन दिले जाणार असे सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा सोनू सूदचे कौतक करावे तितके कमीच आहे. व्हिडीओवर चाहते सोनू सूदवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.  

काही दिवसांपूर्वीच सोनू सूदला कोरोनाची लागण झाली होती. पण स्वत: कोरोना पॉझिटीव्ह असूनही त्याची मदत थांबली नव्हती. आता सोनू कोरोनामुक्त झाला आहे आणि पुन्हा एकदा लोकांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे. आता त्याने एक पाऊल पुढे टाकत सर्वसामान्यांची मोफत कोरोना चाचणी करून देण्याची घोषणा केली आहे. तुम्ही आता आराम करा आणि टेस्टचे माझ्यावर सोपवा, असे लिहित त्याने कोरोना रूग्णांसाठी ही नवी सुविधा सुरु केली आहे.

टॅग्स :सोनू सूद