Join us  

'बिग बॉस' विजेता एल्विश यादव खंडणीप्रकरणी एकाला अटक, आरोपीचा जबाब ऐकून वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 1:48 PM

एल्विशने पोलिसात तक्रार दाखल करताच आरोपीला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले. 

'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss OTT 2)चा विजेता एल्विश यादवकडे (Elvish Yadav) खंडणी मागणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या वडनगर येथील आरोपीने एल्विशकडे १ कोटी रुपयांची मागणी केली होती. गुरुग्रामला राहणाऱ्या एल्विशने पोलिसात तक्रार दाखल करताच आरोपीला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले. 

एल्विशला खंडणीसाठी फोन करणाऱ्या आरोपीचं नाव शाकिर मकरानी असं आहे. त्याचं वय २५ वर्षे आहे. त्याने एल्विशला व्हॉट्सअॅपवर मेसेज करत खंडणीची मागणी केली होती. इतकंच नाही तर त्याने एल्विशच्या मॅनेजरलाही धमकी दिली होती. एसीपी क्राईम वरुण दहियाने सांगितले की, 'गुरुग्राम सेक्टर 52 च्या वजीराबादचा रहिवासी एल्विश यादवच्या तक्रारीनुसार तो काही दिवस मॅनेजरसह देशाच्या बाहेर गेला होता. १७ ऑक्टोबरला भारतात परतल्यानंतर त्याला व्हॉट्सअॅपवर धमकीचे मेसेज आले.'

ते पुढे म्हणाले, 'शाकीरची प्राथमिक चौकशी केली असता तो एल्विशची लाईफस्टाईल पाहून प्रभावित झाला होता. तो एल्विशला युट्यूब आणि इतर सोशल मीडिया साईट्सवर फॉलो करत होता. एल्विशला पाहून आपणही करोडपती व्हावे असं त्याला वाटलं. म्हणूनच त्याने हा कट रचला. यामध्ये त्याने कोणत्याही मोठ्या गँगस्टरचं नाव घेतलेलं नाही.'

आरोपी आणि त्याचे वडील वडनगर येथील आरटीओमध्ये दलालीचे काम करायचे. सध्या त्याच्या गुन्हेगारी बॅकग्राऊंडविषयी काहीही माहिती मिळालेली नाही. त्याला रिमांडवर घेऊन त्याची मदत करणाऱ्यांविषयी तपास सुरु आहे. त्याला एल्विशचा नंबर कुठून मिळाला याबद्दल चौकशी सुरु आहे. त्याच्याकडून सिमकार्ड जप्त करण्यात आलंय.

टॅग्स :बिग बॉसखंडणीगुजरातपोलिस