Join us  

Kiran Mane: '...ही तर दडपशाही!' किरण माने प्रकरणात दिग्दर्शक समीर विद्वांस यांची उडी, काय म्हणाले वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 10:40 PM

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या लोकप्रिय मालिकेतील कलाकार किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढण्यात आल्याच्या प्रकरणात आता चित्रपट दिग्दर्शक, लेखक समीर विद्वांस यांनी उडी घेतली आहे.

मुंबई-

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या लोकप्रिय मालिकेतील कलाकार किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढण्यात आल्याच्या प्रकरणात आता चित्रपट दिग्दर्शक, लेखक समीर विद्वांस यांनी उडी घेतली आहे. एखाद्याचं मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे, अशी रोखठोक भूमिका समीर विद्वांस यांनी घेतली आहे. समीर विद्वांस यांनी या प्रकरणाबाबत एक ट्विट केलं आहे. 

"कोणतीही राजकीय भूमिका घेणं/व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे! किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरुन त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे", असं समीर विद्वांस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेत कलाकार किरण माने काम करत होते. पण त्यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आलं. त्यानंतर किरण माने यांनी राजकीय भूमिकेबाबत फेसबुकवर व्यक्त झाल्यानं आपल्याला मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला आहे. किरण मानेंच्या या दाव्यानंतर अनेक नेत्यांसह विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्या पाठिंब्यासाठी उभी राहिली आहेत. त्यामुळे या वादाला आता राजकीय वळण मिळतं की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

दरम्यान आज दिवसभर या विषयावरुन सुरू असलेल्या दाव्या प्रतिदाव्यांदरम्यान आता मालिकेच्या निर्मार्त्यांनी त्यांची बाजू समोर ठेवली आहे. किरण माने यांना राजकीय भूमिकेमुळे नाही तर प्रोफेशनल कारणांमुळे मालिकेतून बाहेर करण्यात आल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. 

टॅग्स :किरण मानेसमीर विध्वंस