Join us  

मराठी अभिनेते मोहन जोशी यांच्या पत्नीला पाहिलंत का?, त्यांचादेखील आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 7:00 AM

मोहन जोशी यांच्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्यांचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे.

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अभिनेते मोहन जोशी यशच्या आजोबांची भूमिका साकारताना दिसत आहेत. आपल्या नातवाने लग्न करून संसार थाटावा म्हणून ते यशच्या मागे लागलेले असतात. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी आजवर ४५ हुन अधिक नाटक, ३५ हिंदी- मराठी मालिका, २२० मराठी चित्रपट आणि ३४५ हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या या वाटचालीत त्यांची पत्नी ज्योती जोशी यांची खंबीर साथ मिळाली आहे. मोहन जोशी यांच्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्यांचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. 

मोहन जोशी यांच्या पत्नी ज्योती जोशी या निर्मात्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांना गौरी आणि नंदन ही दोन मुले आहेत. मोहन जोशी यांचा मुलगा नंदन अभिनय क्षेत्रात न येता तो एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.

नंदन हा इंटेरिअर डिझायनर असून रचना संसद आर्किटेक्ट स्कुलमधून त्याने प्रशिक्षण घेतले आहे. तर मुलगी गौरी हिचे लग्न झाले असून सध्या ती बंगलोर येथे आपल्या कुटुंबासोबत स्थायिक झाली आहे. 

मोहन जोशी यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला तो बालवयापासूनच. सहावी इयत्तेत शिकत असताना त्यांनी ‘टूणटूण नगरी खणखण राजा’ या नाटकात काम केले. पुरुषोत्तम करंडक, महाराष्ट्र कामगार कल्याण स्पर्धा, औद्योगिक ललित कलामंडळ अशा स्पर्धातून त्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. कॉमर्स विषयातून पदवी घेतल्यावर त्यांनी पुण्यातील किर्लोस्कर कंपनीत नोकरी केली मात्र नाटकात काम करण्यासाठी त्यांना वारंवार सुट्ट्या घ्याव्या लागत त्यामुळे त्यांना सारखे खोटे बोलावे लागत होते.

शेवटी अभिनय की नोकरी या दोन्ही पैकी एक गोष्ट निवडावी म्हणून हातच्या नोकरीला त्यांनी राम राम ठोकला. दरम्यान स्वतःच्या ट्रकवर त्यांनी ड्रायव्हरचे कामदेखील केले. अभिनयाच्या वेडापायी त्यांनी मुंबई गाठली. ‘कुर्यात सदा टिंगलम’ हे त्यांनी अभिनय केलेले पहिले व्यावसायिक नाटक ठरले.

भुताचा भाऊ’ या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेइंडस्ट्रीत पहिले पाऊल टाकले. या चित्रपटातून त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली. पुढे अशाच धाटणीच्या भूमिकांनी त्यांनी मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्रीत नाव कमावले. देऊळबंद, पुष्पक विमान या चित्रपटात त्यांनी काम केले.

तसेच अग्गंबाई सूनबाई या मालिकेतील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. सध्या ते माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत आजोबांच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. 

टॅग्स :मोहन जोशीअग्गंबाई सूनबाईपुष्पक विमान चित्रपट