Join us

सांस्कृतिक राजधानी पुण्यात थिरकणार ' डान्स महाराष्ट्र डान्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 09:35 IST

पुणे तिथे काय उणे? असं प्रत्येक पुणेकर अगदी अभिमानाने सांगतो. शिक्षणाच्या माहेरघरासोबत सांस्कृतिक लेणं जपणाऱ्या पुण्यात डान्सकडे पॅशन म्हणून ...

पुणे तिथे काय उणे? असं प्रत्येक पुणेकर अगदी अभिमानाने सांगतो. शिक्षणाच्या माहेरघरासोबत सांस्कृतिक लेणं जपणाऱ्या पुण्यात डान्सकडे पॅशन म्हणून पाहणाऱ्यांसाठी झी युवा घेऊन येणार आहे खास मंच. 'डान्स महाराष्ट्र डान्स' या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देणारी ऑडिशन पुण्यात २४ डिसेंबरला रंगणार आहे. ज्ञानसागर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, एस. के. पी कॅम्पस, बाणेर बालेवाडी मार्ग पुणे या ठिकाणी सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत ही ऑडिशन होणार आहे.या ऑडिशनमध्ये ४ वर्षांवरील कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकणार आहेत. एकटे, जोडीदारासोबत किंवा पूर्ण ग्रुपसोबतही सहभागी होऊ शकता. वेगवेगळ्या पाश्चिमात्य डान्स स्टाइल्सला मराठमोळा तडका देऊन नृत्याविष्कार सादर करणे हे या शोचे वैशिष्ट्य असेल. सवाई गंधर्व संगीत महोत्सवापासून ते पुणे फेस्टिव्हल, पुणे चित्रपट महोत्सव अशा एकाहून एक सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यात सांस्कृतिक पर्वणी सुरूच असते. कसलेल्या कलाकारांपासून दर्दी रसिकांपर्यंतच्या कित्येक पिढ्या पुण्याच्या मातीत घडल्या आहेत. पट्टीच्या कलाकाराला तितक्याच आत्मीयतेने दाद देणारा रसिक पुण्यात हमखास असतोच. अशा हरहुन्नरी कलाकारांची मांदियाळी असलेल्या पुण्यातील डान्सच्या वेडाने झपाटलेल्या पुणेकरांना डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर नृत्यकौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. युवकांच्या आवडीची नस पकडणाऱ्या झी युवावर लवकरच डान्स महाराष्ट्र डान्स हा सळसळता कार्यक्रम दाखल होणार आहे. झी युवा वाहिनीवरील देवाशप्पथ मालिकेचे कलाकार आणि त्यांच्याबरोबर , प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि डान्स महाराष्ट्र डान्स च्या जज फुलवा खामकर या सुद्धा खास पुण्याच्या डान्सर्सना चिअरअप करण्यासाठी येणार आहे.नृत्यावर आधारित रिअॅलिटी शोच्या या गर्दीत 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमाने स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे. तमाम मराठी प्रेक्षकांना स्वतःत असलेले नृत्यगुण जगासमोर आणण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.