Join us  

वर्षा उसगावकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत होणार एंट्री !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 12:21 PM

९०च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. अभिनयासह त्यांच्या सौंदर्याने रसिकांना भुरळ घातली.

मराठी चित्रपटसृष्टीत ९०च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. अभिनयासह त्यांच्या सौंदर्याने रसिकांना भुरळ घातली. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही त्या आधीप्रमाणेच सुंदर आणि चिरतरुण दिसतात. चित्रपटात त्यांचं दर्शन होत नसलं तरी मराठी तारकासारख्या कार्यक्रमात त्या आपल्या नृत्याची आवड जोपासताना दिसतात. गंमत जंमत, हमाल दे धमाल, लपंडाव, भुताचा भाऊ यासारखे मराठी चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांना भावल्या. इतकंच नाहीतर मराठीतील या यशामुळे वर्षा उसगांवकर यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारं उघडली. परवाने, तिरंगा, हस्ती, दूध का कर्ज, घर आया मेरा परदेसी अशा विविध चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी भूमिका साकारल्या.  आता पुन्हा एकदा वर्षा उसगांवकर भरघोस मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर भेटीला येणार आहेत. जवळपास १० वर्षांपूर्वी स्टार प्रवाहच्याच मन उधाण वाऱ्याचे या मालिकेत त्या भेटीला आल्या होत्या. स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत त्या नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. वर्षाजींना आतापर्यंत आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतला त्यांचा घरंदाज सासुचा अंदाज नक्कीच वेगळा ठरणार आहे.

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या, १० वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सची मालिका करताना आनंद होतोय. मालिकेमुळे आपण घराघरात पोहोचतो. प्रेक्षकांच्या जगण्याचा भाग होतो. त्यामुळेच मालिका करताना मला नेहमीच आनंद होतो. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतली ही भूमिका नक्कीच वेगळी आहे. नंदिनी गृहोद्योग समुहाची ती प्रमुख आहे. यासोबतच कोल्हापुरातल्या शिर्के पाटील या नामांकित कुटुंबाचं ती प्रतिनिधीत्व करते. नंदिनी हे पात्र प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. 

टॅग्स :वर्षा उसगांवकर