Join us  

अशाप्रकारे सुरू आहे मुस्कान फेम शरद मल्होत्राच्या लग्नाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 8:00 AM

पारंपरिक पंजाबी पद्धतीने शरद मल्होत्रा आणि रिप्की भाटिया यांचे लग्न होणार असून या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे.

ठळक मुद्दे शरदला मालिकेच्या चित्रीकरणाचे वेळापत्रक सांभाळून आपल्या विवाहाची तयारी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शरदला मुस्कान या मालिकेच्या टीममधील सगळेच लग्नाच्या तयारीसाठी मदत करत आहेत.

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा यांनी बनू मैं तेरी दुल्हन या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेच्यावेळी त्यांच्या प्रेमकथेची चांगलीच चर्चा रंगली होती. अनेक वर्षांच्या अफेअरनंतर त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. दिव्यांकाने ये है मोहोब्बते या मालिकेतील तिचा सहकलाकार विवेक दहियासोबत लग्न केले तर शरद अभिनेत्री पूजा बिष्टसोबत नात्यात होता. पण पूजासोबत देखील त्याने काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप केले आणि आता शरद मल्होत्रा एका फॅशन डिझायनरसोबत लग्न करत आहे.

‘स्टार भारत’वरील ‘मुस्कान’ या मालिकेत सध्या शरद मल्होत्रा मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेत त्याची अनेक लग्न झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता वास्तव जीवनात शरद विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या एप्रिलमध्ये दिल्लीमध्ये राहाणाऱ्या रिप्की भाटियासोबत तो लग्न करणार आहे. रिप्की ही फॅशन डिझायनर असून गेल्या कित्येक महिन्यांपासून त्या दोघांच्या अफेअरची चर्चा मीडियात सुरू आहे.

पारंपरिक पंजाबी पद्धतीने शरद आणि रिप्की यांचे लग्न होणार असून या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. शरदला मालिकेच्या चित्रीकरणाचे वेळापत्रक सांभाळून आपल्या विवाहाची तयारी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शरदला मुस्कान या मालिकेच्या टीममधील सगळेच लग्नाच्या तयारीसाठी मदत करत आहेत. याविषयी शरद सांगतो, “माझ्या लग्नाचा दिवस जसा जवळ येत चालला आहे, तशी लग्नाची तयारी खूपच बाकी असल्याचे मला जाणवत आहे. मी चित्रीकरणात व्यग्र असलो तरी लग्नाची खरेदी करण्यासाठी वेळ काढत आहे. मुस्कान या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ सगळेच त्यांच्या परीने मला यात मदत करत आहेत. मला रिप्कीला वेळ देता यावा अशा पद्धतीने ते माझ्या चित्रीकरणाचं वेळापत्रक देखील ठरवत आहेत. त्यांच्याकडून माझे जे लाड होत आहेत आणि माझ्यावर ते प्रेमाचा जो वर्षाव करीत आहेत, त्यामुळे ते माझ्या परिवारातील सदस्यच बनले आहेत. अशा लोकांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, हे माझं सुदैवच मानतो.”

टॅग्स :मुस्कान