सध्या जगभरात कोरोना या व्हायरसने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस संक्रमित झालेल्या रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. रूपेरी पडद्यावरील सेलिब्रिटींना मात्र एका वेगळयाच समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेकांच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या जात असून कोरोनामुळे ही सेलिब्रिटी मंडळी चांगलीच नाराज झाल्याचे दिसून येतेय. नुकतेच टीव्ही जगतातील पुजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांचे लग्न एप्रिलमध्ये होणार असून आता सध्या तरी हे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा आणि कुणाल यांनी त्यांचे लग्न सध्या तरी थांबवले असून ते पुढील महिन्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणाल सांगतो,‘ सध्यातरी आम्ही ही प्रार्थना करतो की, सर्वकाही ठीक व्हावे. ३१ मार्चनंतर आम्ही लग्नाबद्दल काही निर्णय घेऊ. आता आम्ही लग्नाच्या बाबतीत अजून विचार करत आहोत.’
पूजा आणि कुणाल हे ९ वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. २०१७ मध्ये या दोघांनी साखरपुडा करून घेतला होता. काही दिवसांपूर्वी पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाबद्दलची घोषणा केली होती. तिने शेअर केलेल्या या फोटोला कॅप्शन दिले होते की,‘मी महिला दिनाच्या निमित्ताने एक मोठी घोषणा करू इच्छिते. मी एक बहीण आहे, मुलगी आहे, मैत्रीण आहे, गर्लफ्रेंड आहे. आता लवकरच पत्नी बनणार आहे. आम्ही लग्न करणार आहोत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांची मला गरज आहे.