सीआयडी फेम शिवाजी साटम म्हणतायेत या आहेत सगळ्या अफवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:52 IST
सीआयडी या मालिकेत एसपी प्रद्युमनचे निधन झाल्याचे दाखवण्याच येणार असून हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या बातम्या गेल्या ...
सीआयडी फेम शिवाजी साटम म्हणतायेत या आहेत सगळ्या अफवा
सीआयडी या मालिकेत एसपी प्रद्युमनचे निधन झाल्याचे दाखवण्याच येणार असून हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत आहेत. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे शिवाजी साटम आणि दया शेट्टी यांनी आपले मानधन वाढवण्याची मागणी केल्यामुळे प्रोडक्शन हाऊसने हा कार्यक्रमच बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात होते. पण या सगळ्या केवळ अफवा असून सीआयडी मालिका बंद होणार नसल्याचे खुद्द शिवाजी साटम यांनी सांगितले आहे. या सगळ्या बातम्या कोण पसरवत आहेत आणि अशा बातम्या पसरवून कोणाला आनंद मिळत आहे असे त्यांचे म्हणणे आहे.शिवाजी साटम याविषयी सांगतात, "गेल्या पाच-सहा दिवसांपासून या मालिकेबाबत मला अनेकजण विचारणार आहेत. ही मालिका बंद होणार आहे का? तसेच माझ्या व्यक्तिरेखेचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येणार आहे का? असे विचारण्यासाठी अनेकांचे फोन येत आहेत. खरे तर आता सगळ्यांना उत्तरं देऊनही मी कंटाळलेलो आहे. अशा चुकीच्या बातम्या देण्यात कोणाला आनंद मिळतो हेच मला कळत नाहीये. या बातम्या आल्यापासून माझे नातलग, फ्रेंड्सदेखील मला फोन करून याबाबत विचारत आहेत. मी माझ्या फॅन्सना सांगू इच्छितो की, या केवळ अफवा असून सीआयडी या मालिकेत एसपी प्रद्युमनचा मृत्यू झालेला दाखवण्यात येणार नाहीये. तसेच ही मालिका बंद होणार असल्याची बातमीदेखील पूर्णपणे चुकीची आहे. सीआयडी यापुढेदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे." सीआयडी ही मालिका गेल्या 18 वर्षांपासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.