विरेन प्रधान दिग्दर्शित 'उंच माझा झोका' (Uncha Maza Jhoka) एकेकाळची गाजलेली मालिका आहे. या मालिकेतून रमाबाई रानडे यांचा जीवन प्रवास रेखाटण्यात आला होता. या मालिकेत शरद पोंक्षे, कविता लाड, शैलेश दातार, शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिकांमध्ये दिसले होते. मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं ते छोट्या रमाबाईंनी. या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार तेजश्री वालावलकर (Tejashree Walawalkar) हिने साकारली होती. तर रमाबाई रानडे यांच्या मोठेपणाची भूमिका स्पृहा जोशीने बजावली होती. या दोघींनाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. स्पृहा सिनेइंडस्ट्रीत चांगलीच सक्रीय आहे. पण बालकलाकार तेजश्री बऱ्याच मोठ्या कालावधीपासून इंडस्ट्रीतून गायब आहे. आता ती मोठी झाली असून तिला ओळखणं कठीण झालं आहे. मात्र ती लवकरच सिनेइंडस्ट्रीत पुनरागमन करणार आहे.
तेजश्री वालावलकर हिने नुकतेच कलाकृती मीडियाला मुलाखत दिली आहे. यात तिने 'उंच माझा झोका' मालिकेबद्दल आणि कमबॅक करण्याबद्दल सांगितले आहे. तेजश्री सध्या पुण्यात राहते आहे. तिला या मुलाखतीत ती सध्या काय करते आहे, असे विचारले तेव्हा ती म्हणाली की, तेजश्री पुन्हा एकदा सगळ्यांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होते आहे. लवकरच काही गोष्टी समोर येतील आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना एका वेगळ्या रुपात भेटेन.
सिनेइंडस्ट्रीतून तेजश्री बराच काळ गायब होती, त्यामागे काय कारण होते, असे विचारल्यावर तिने सांगितले, रमाबाईंची इमेज सर्वांच्या मनात इतकी ठसली होती की तेजश्री म्हणजे रमाबाई असे लोकांचे झाले होते. कुठेतरी हे थांबायला हवे असे वाटत होते. तसेच मी मिड एजमध्ये होते. त्यामुळे मी काहीतरी काम करायचे म्हणून जी भूमिका मिळतेय ती करू, असे करायचे नव्हते. त्यामुळे मी जाणूनबुजून ब्रेक घेतला. माझ्या आवडत्या भूमिकेतून मला परत एकदा पुढे यायचे होते. त्या भूमिकेच्या मी प्रतीक्षेत होते. आता लवकरच आपली भेट होईल.