Join us  

Bigg Boss Marathi 3 : वेदनांनी विव्हळत होतो, शरीरभर नळ्या होत्या..., महेश मांजरेकरांनी सांगितला ‘तो’अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 1:33 PM

Bigg Boss Marathi 3 : काल ‘बिग बॉस मराठी 3’ची पत्रकारपरिषद झाली. या पत्रकार परिषदेत महेश मांजरेकर यांनी प्रोमो शूट करतानाचा हा अनुभव सांगितला.

ठळक मुद्दे बिग बॉस मराठी 3 चा ग्रँड प्रिमियर 19 सप्टेंबर रोजी होणार आहे.

बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 3) तिसरा सीझन येत्या रविवारपासून म्हणजेच  19 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. साहजिकच बिग बॉसच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आधीचे दोन्ही सीझन महेश मांजरेकर यांनी गाजवलीत. होस्ट म्हणून त्यांचा दरारा, त्यांचा वावर अफलातुन ठरला. तिसरा सीझनही महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हेच होस्ट करणार म्हटल्यावर चाहते खुश्श आहेत. अलीकडेच महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रासले होते. नुकतीच त्यांच्यावर शस्त्रकिया पार पडली आणि कॅन्सरला हरवून महेश मांजरेकर कामावर परतले. शस्त्रक्रियेतून उठल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी ‘बिग बॉस मराठी 3’चे प्रोमो शूट केले. काल ‘बिग बॉस मराठी 3’ची पत्रकारपरिषद झाली. या पत्रकार परिषदेत महेश मांजरेकर यांनी प्रोमो शूट करतानाचा हा अनुभव सांगितला.

 मला प्रचंड वेदना होत होत्या...ते म्हणाले, ‘बिग बॉस मराठी 3’चा पहिला प्रोमो शूट झाला, तो दिवस कदाचित मी कधीच विसरू शकणार नाही. प्रोमो शूट करताना मला असह्य वेदना होत होत्या. शरीरभर वेदना होत्या. शरीरात अनेक ठिकाणी नळ्या लावलेल्या होत्या. या नळ्या कॅमे-यात कुठेही दिसू नये, यासाठी नाही नाही प्रयत्न सुरू होते. पण शूट पूर्ण करायचेच ही एक जिद्द होती. मी अस्वस्थ होतो, वेदनांनी विव्हळत होतो. पण चेह-यावर हे काहीही न दिसू देता मी जिद्दीने शूटींग पूर्ण केले. यानंतर लोकांना ‘बिग बॉस मराठी 3’चे प्रोमो आवडले, याचा आनंद मोठा होता.

काही महिन्यांपूर्वी महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर काही दिवसांनी त्यांनी ‘बिग बॉस मराठी 3’ च्या पहिल्या प्रोमोचे शूटींग केले होते. 

टॅग्स :महेश मांजरेकर बिग बॉस मराठी