Join us  

आठभडावर झाली केवळ बिग बॉस मराठीचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 8:00 PM

बिग बॉस मराठीची या आठवड्यात घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमाबाबत आता लोकांना उत्सुकता लागली आहे.

ठळक मुद्देया कार्यक्रमाचे चित्रीकरण हे मुंबई फिल्मसिटी मध्ये होणार आहे. लवकरच या कार्यक्रमाचा सेट तिथे उभारण्यात येणार आहे. या आधी बिग बॉस मल्याळमचे चित्रीकरण येथे करण्यात आलेले आहे.

वाद, विरोध, प्रेम, मैत्री अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोच्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाची टीम जोरदार कामाला लागली आहे. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार याविषयी कलर्स मराठी या वाहिनीनेच प्रेक्षकांना सांगितले होते. त्यांनी बिग बॉस मराठी परत येतोय असा व्हिडिओ त्यांच्या फेसबुकच्या पेजवर पोस्ट केला होता. 

बिग बॉस मराठीची या आठवड्यात घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमाबाबत आता लोकांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉस या कार्यक्रमाच्या आजवरच्या सगळ्याच सिझनला प्रेक्षकांचे खूपच चांगले प्रेम मिळाले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करतो. याच कार्यक्रमाच्या धर्तीवर आपल्याला बिग बॉस मराठी पाहायला मिळाला होता. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनच्या अंतिम फेरीत मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर या स्पर्धकांनी मजल मारली होती. प्रेक्षकांच्या मतांमुळे प्रेक्षकांची लाडकी मेघा धाडे या कार्यक्रमाची विजेती ठरली होती. पहिल्या सिझनमधील सगळ्याच सेलिब्रेटींना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. त्यामुळे आता दुसऱ्या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी झळकणार याचा अंदाज अनेक वाहिन्या आणि वृत्तपत्रांकडून लावला जात आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या कार्यक्रमातील शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपाणकर, गौतम जोगळेकर हे कलाकार बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. 

बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याविषयी माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनीलला देखील विचारण्यात आले होते. रसिकानेच याबाबत नुकताच खुलासा केला होता. बिग बॉस मराठीच्या टीमकडून अद्याप कोणत्याच स्पर्धकाचे नाव सांगण्यात आलेले नाही. तसेच कोणत्या कलाकाराने देखील बिग बॉसमधील प्रवेशाबाबत मीडियाला काहीही सांगितले नाही. त्यामुळे केवळ सगळेच स्पर्धकांबद्दल केवळ तर्क वितर्क लावत आहेत.

तसेच बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे चित्रीकरण हे लोणावळ्याला झाले होते. पण एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार या कार्यक्रमाचे चित्रीकरण हे मुंबई फिल्मसिटी मध्ये होणार आहे. लवकरच या कार्यक्रमाचा सेट तिथे उभारण्यात येणार आहे. या आधी बिग बॉस मल्याळमचे चित्रीकरण येथे करण्यात आलेले आहे. मुंबईत चित्रीकरण करणे हे सोयीस्कर असल्याने बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या टीमने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. 

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. आता दुसऱ्या सिझनमध्ये देखील तेच या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार असल्याचे म्हटले जात आहे. 

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कधी सुरू होणार, या कार्यक्रमात कोणकोणते सेलिब्रेटी झळकणार हे आपल्याला काहीच दिवसांत कळेल. 

टॅग्स :बिग बॉस मराठी