बालहनुमान दिसणार या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 17:25 IST
संकट मोचन महाबली हनुमान या मालिकेत इशांत भानुशालीने बालहनुमानाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील नटखट हनुमान सगळ्यांना खूप आवडला ...
बालहनुमान दिसणार या मालिकेत
संकट मोचन महाबली हनुमान या मालिकेत इशांत भानुशालीने बालहनुमानाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील नटखट हनुमान सगळ्यांना खूप आवडला होता. पण या मालिकेने नुकताच लीप घेतला. त्यामुळे इशांतने प्रेक्षकांचा निरोप घेतला. इशांत मालिकेत नसल्यामुळे इशांतचे फॅन्स त्याला खूप मिस करत आहेत. पण त्याच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. तो एका मालिकेत झळकणार आहे. दिल देके देखो ही मालिका काहीच दिवसांपूर्वी सुरू झाली. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत आता इशांतची एंट्री होणार आहे. इशांत या मालिकेत बंटी ही भूमिका साकारत असून तो तुलसी चोप्राचा म्हणजेच नवनीत निशानचा नातू दाखवला जाणार आहे. तो त्याच्या आजीचा खूपच लाडका आहे. आजीचे पानदेखील त्याच्याशिवाय हलत नाही. पण तो अतिशय मस्तीखोर आहे. तसेच तो पटकन चिडतो यामुळे सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होता. तो वयाने लहान असला तरी त्याच्यात खूप अॅटीट्युड आहे. बालहनुमानापेक्षा त्याची ही भूमिका खूप वेगळी असल्याने या मालिकेत काम करताना त्याला खूप मजा येत आहे. याविषयी इशांतची आई सांगते, "इशांतने काही दिवसांपूर्वीच मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. तो या मालिकेत खूप मस्तीखोर दाखवला असला तरी तो त्याच्या खऱ्या आयुष्यात खूप शांत आहे. त्यामुळे त्याला ही भूमिका साकारण्यासाठी या मालिकेचे दिग्दर्शक खूप मदत करतात. अॅटीट्युड असलेली मुले कसे वागतात हे त्याला शिकवतात. त्यांच्यामुळेच त्याला भूमिका साकारायला सोपे जात आहे."