Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मीत’मध्ये लवकरच अस्मिता शर्माची एंट्री, अशी असणार भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 12:27 IST

 ‘मीत’ या मालिकेने रसिकांची चांगलीच पसंती मिळवली आहे. मालिकेतील मीत (आशी सिंह) ही नायिका काम आणि जबाबदारी देताना होणार्‍या ...

 ‘मीत’ या मालिकेने रसिकांची चांगलीच पसंती मिळवली आहे. मालिकेतील मीत (आशी सिंह) ही नायिका काम आणि जबाबदारी देताना होणार्‍या स्त्री-पुरुष भेदभावाविरोधात संघर्ष करणार्‍या अनेक महिलांचे प्रतिनिधित्त्व करते. या मालिकेत आशी सिंह ही मीत हूडाची भूमिका साकारीत असून आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांवर आपला प्रभाव टाकला आहे. आता मालिकेच्या कथानकाचा काळ एका वर्षाने पुढे नेल्यानंतर मंजिरीच्या रूपातील आशी सिंह प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे, असे दिसते. कथानकातील नाट्यपूर्णता सुरूच असून आता बर्फीदेवी ही नवी व्यक्तिरेखा मालिकेत प्रवेश करणार आहे. तिच्यामुळे अहलावत कुटुंबियांच्या जीवनात उलथापालथ घडेल.

लोकप्रिय अभिनेत्री अस्मिता शर्मा ही बर्फीदेवीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. बर्फीदेवी ही दीपची (आशुतोष सेमवाल) आई असून ईशाच्या लग्नप्रसंगात अहलावत कुटुंबियांनी आपला मुलगा दीपशी केलेल्या गैरवर्तनाचा सूड घेण्यासाठी बर्फीदेवी आली आहे. बर्फीदेवी ही कणखर मनाची हरयाणवी स्त्री असून ती लोभी स्वभावाची आहे. तिला तिचा मुलगा दीपचे लग्न करायचे असून त्यामुळे तिला वधूच्या कुटुंबियांकडून हुंडा मागण्याची संधी मिळेल. 

ती आपल्या आजुबाजूला असलेल्या सर्वांवर आपले नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. ही व्यक्तिरेखा साकारण्यास अस्मिता खूप उत्सुक झाली असली, तरी मालिकेत प्रथमच भूमिता साकारण्याची संधी मिळाल्यामुळे ती खूपच अधीर झाली आहे.

अस्मिता शर्मा म्हणाली, “माझ्या संपूर्ण कारकीर्दीत मी अगदी भिन्न प्रकारच्या भूमिका साकारण्यावर कटाक्ष ठेवला आहे. मीत मालिकेत मी एका जबर इच्छाशक्ती असलेल्या आणि कुटिल स्वभावाच्या एका हरयाणवी महिलेची व्यक्तिरेखा उभी करणार आहे. ही माझी पहिलीच मालिका असल्यामुळे या मालिकेत भूमिका साकारण्यास मी खूप उत्सुक बनले आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी माझं मोकळ्या मनाने स्वागत केलं. आतापर्यंत त्यांच्याबरोबर काम करताना मला खूप मजा आली आहे. 

प्रेक्षकांना मालिकेच्या कथानकाला मिळालेली कलाटणी आणि माझी भूमिका पसंत पडेल, अशी मी आशा करते.”अस्मिता ही अहलावत कुटुंबियांच्या जीवनात नवे प्रश्न निर्माण करणार असली, तरी मीत अहलावत हा मंजिरीबद्दल कायम संशय घेताना पाहणे मजेशीर ठरेल. मंजिरी ही खरे म्हणजे मीत हूडाच आहे, अशी त्याची आता समजूत होते, पण तो सत्य काय आहे, ते जाणून घेऊ शकतो का? या सगळ्या गोष्टी आगामी भागात उलगडणार आहेत.