Join us  

"जय जवान जय किसान हे शाळेत शिकवतात, पण...", शेतकरी आंदोलनातील अश्रुधुरावरून मराठी अभिनेत्री संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:27 AM

राजधानी दिल्लीकडे जाण्यापासून शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मंगळवारी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यावरुन आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. 

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी पुन्हा त्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीकडे मोर्चा घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. पण, पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवरच शेतकऱ्यांचा दिल्ली चलो मोर्चा थांबवण्यात आला आहे. राजधानी दिल्लीकडे जाण्यापासून शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मंगळवारी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यावरुन आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. 

अश्विनी महांगडे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत राणू अक्काची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अश्विनीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अश्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील घडामोडींवर ती अगदी परखडपणे तिचं मत मांडताना दिसते. आता अश्विनीने शेतकरी आंदोलनाचा व्हिडिओ शेअर करत निषेध व्यक्त केला आहे. "जय जवान आणि जय किसान हे शाळेत शिकवतात...आता समजतं नुसतं जय म्हणून जय होत नाही", असं म्हणत अश्विनीने संताप व्यक्त केला आहे. अश्विनीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

पंजाब-हरियाणा सीमेवर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी पाण्याचा तोफ आणि अश्रुधुराचा वापर केला. यादरम्यान ६० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या कारवाईत १०० हून अधिक शेतकरी जखमी झाल्याचा दावा शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयानेही या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे, बळाचा वापर हा शेवटचा उपाय असावा, असे न्यायालयाने म्हटलं आहे. 

याबरोबरच सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सीमांवर सिमेंट आणि लोखंडाचे बॅरिकेडिंगही करण्यात आले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी तारा आणि कंटेनरही ठेवण्यात आले आहेत. दिवसभर शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. संध्याकाळी सूर्य मावळल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवले. परंतु. बुधवारी सकाळी पुन्हा दिल्लीकडे कूच करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

टॅग्स :शेतकरी आंदोलनटिव्ही कलाकारअश्विनी महांगडे