Join us  

‘मोलकरीण बाई’ या मालिकेच्या शीर्षकगीताविषयी सांगतायेत अशोक पत्की

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 6:30 AM

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचं संगीत, लेखिका रोहिणी निनावे यांचे शब्द आणि ऊर्मिला धनगरच्या आवाजात मोलकरीण बाई या मालिकेतील शीर्षकगीताच्या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलंय.

ठळक मुद्दे‘मोलकरीण बाई’ या मालिकेच्या शीर्षकगीताविषयी सांगताना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की सांगतात, ‘प्रत्येकाला आपलंसं वाटेल असं हे शीर्षकगीत आहे. दिस रात पदरात, जरी कष्टाचं आंदण... दाराशी बांधलं तिनं, स्वप्नांचं तोरण... हे शब्दच खूप बोलके आहेत.

२५ मार्चपासून सायंकाळी ६.३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘मोलकरीण बाई’ या मालिकेच्या प्रोमोजनी सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेतलंय. प्रोमोजप्रमाणेच या मालिकेचं शीर्षकगीतही काळजाला भिडणारं आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचं संगीत, लेखिका रोहिणी निनावे यांचे शब्द आणि ऊर्मिला धनगरच्या आवाजात या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलंय.

अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई ही नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. जिच्या असण्याने आयुष्य जितकं सुखकर होतं, तितकंच तिच्या नसण्याने अस्ताव्यस्त. कुटुंबातली सदस्य नसली तरी ती कुटुंबातलाच एक अविभाज्य भाग असते. आपल्या आयुष्यातल्या याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट सांगणारी ‘मोलकरीण बाई’ ही मालिका लवकरच ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. घरकाम करणाऱ्या स्त्रियांचं भावविश्व मालिकेच्या शीर्षकगीतातून रेखाटण्यात आलंय.

‘मोलकरीण बाई’ या मालिकेच्या शीर्षकगीताविषयी सांगताना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की सांगतात, ‘प्रत्येकाला आपलंसं वाटेल असं हे शीर्षकगीत आहे. दिस रात पदरात, जरी कष्टाचं आंदण... दाराशी बांधलं तिनं, स्वप्नांचं तोरण... हे शब्दच खूप बोलके आहेत. ममता आणि गावरान ठसका याचा उत्तम मिलाफ या शीर्षकगीताचं वेगळेपण म्हणता येईल.

रोहिणी निनावेंनी हे शीर्षकगीत लिहिलं आहे. मालिकेची कथा आणि पात्रांचं मनोगत शीर्षकगीतातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी सांगितलं. कष्ट करणाऱ्या स्त्रियांविषयीची ही मालिका आहे. दु:खातही सुख शोधण्याची त्यांची सकारात्मक वृत्ती ‘मोलकरीण बाई’ या मालिकेतून मांडण्यात येणार आहे. प्रेक्षकांना हे शीर्षकगीत आणि मालिका नक्की आवडेल अशी भावना रोहिणी निनावे यांनी व्यक्त केली.

ऊर्मिला धनगरच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालंय. सुंदर शब्द आणि सुरेख चाल असल्यामुळे हे गाणं गाताना खूपच मजा आली. माझ्यासाठी हे शीर्षकगीत खूपच स्पेशल असल्याचं ऊर्मिला म्हणाली.

उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने नेहमीच प्रेक्षकांच्या आवडी-निवडीचा विचार करत वैविध्यपूर्ण मालिका सादर केल्या आहेत. ‘मोलकरीण बाई’ ही मालिकादेखील अशाच एका अनोख्या जगाची सफर तुम्हाला नक्की घडवेल.

 

टॅग्स :स्टार प्रवाहअशोक पत्की