सूरज चव्हाणची (suraj chavan) भूमिका असलेला 'झापुक झुपूक' सिनेमा (zapuk zupuk) काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. सिनेमाची बरीच हवा होती पण या सिनेमाला हवं तसं यश मिळालं नाही. अपेक्षेपेक्षा सिनेमाने कमी कमाई केली. सूरज चव्हाणने 'बिग बॉस मराठी ५' जिंकल्याने त्याच्या फॅन फॉलोईंगमध्ये खूप वाढ झाली. पण सूरजचे हेच चाहते सिनेमा पाहायला थिएटरमध्ये गेल्याचं तितकं दिसलं नाही. या सर्व गोष्टींवर सूरजची खास मैत्रीण आणि कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरने (ankita walawalkar) तिचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
अंकिता झापुक झुपूक सिनेमाबद्दल काय म्हणाली?
अमृता राव यांना दिलेल्या मुलाखतीत अंकिताला याविषयी प्रश्न विचारण्यात आला. "सूरज चव्हाणचे खूप फॅन्स आहेत. बिग बॉसमुळे त्याचे फॅन्स आणखी वाढले आहेत. तरीही त्याच्या चित्रपटाला अपयश का येतंय? का लोक जात नाहीयेत थिएटर्समध्ये?", या प्रश्नाचं उत्तर देताना अंकिता म्हणाली की, "आता जसं तुम्ही म्हणालात की, सूरजच्या पिक्चरला जास्त लोक आली नाहीत. त्याचं कारण पण हेच आहे की, त्याचं फॅन फॉलोईंग जे आहे त्यात जास्त गावाकडची लोक किंवा तशी लोक आहेत."
"त्यामुळे त्या लोकांना थिएटरपर्यंत आणणं ही महाकठीण गोष्ट आहे. कितीही फिल्म तुम्ही प्रमोट करा पण अशी लोक चित्रपटगृहांकडे वळत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे, आपण गरीब आहोत म्हणजे सगळेजण आपल्याला छान म्हणतील, सिंपथी मिळेल असं झालंय. सूरज लोकप्रिय झाला त्याचं कारण तसं होतं, वातावरण तसं होतं. तो एक मुलगा लोकांना आवडला, त्याचा निरागसपणा लोकांना आवडला. एक सूरज झाला तसे दहा सूरज नाही होऊ शकत, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे."
"सगळीकडे bio मध्ये लिहिलं जातं की हॅशटॅग मी गरीबाचं पोरगं, हॅशटॅग गरीबाचं लेकरु. तर तुम्ही नक्की काय करताय? ती तुम्हाला गरीबीचा अभिमान वाटतोय की गरीबी तुम्ही ग्लोरीफाय करताय? म्हणजे, आपण एखाद्या गोष्टीवर मात करुन पुढे गेलं पाहिजे हे करण्यापेक्षा, तो गरीब होता म्हणून फेमस झाला तर आपणही आपली गरीबी जास्तीतजास्त दाखवूया यासाठी लोक इन्फ्लुएन्स होतात, ते चुकीचं आहे."
अंकितालाही झालेली सिनेमांसाठी विचारणा
"मलाही सिनेमांसाठीच्या ऑफर आल्या पण असा लीड रोल नाही. माझं म्हणणं एकच असतं की, आता ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत ते सर्व स्वतःला इनफ्लुएन्सरच म्हणत आहेत. कोणी स्वतःला क्रिएटर म्हणायला जात नाही. सगळे इनफ्लुएन्सरच म्हणतात. या शब्दाचा अर्थ बऱ्याच लोकांना कळालेला नाहीय. तुमच्यामुळे लोक इनफ्लुएन्स होत आहेत का? इनफ्लुएन्स होण्यासारखं तुम्ही लोकांना देत आहात का? हे काहीच स्पष्ट नाहीये. सगळीकडे इन्स्टाग्रामचा आकडा बघून घेतलं जातंय. हिच्याकडे खूप फॉलोअर्स आहेत तर घेऊया."