Join us  

‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 6:41 PM

‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेच्या कथानकाचा काळ आता 10 वर्षांनी पुढे नेण्यात येणार आहे. यामुळे तरूणपणातील मरियमची कथा महिमा मकवाणा ही अभिनेत्री एका अगदी नव्या रूपात आणि वेशात पुढे सादर करणार आहे.

ठळक मुद्देअंजू या मालिकेत एका वेगळ्या प्रकारची व्यक्तिरेखा साकारणार आहेमरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिका 10 वर्षांनी पुढे जाणार आहे

 ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेच्या कथानकाचा काळ आता 10 वर्षांनी पुढे नेण्यात येणार आहे. यामुळे तरूणपणातील मरियमची कथा महिमा मकवाणा ही अभिनेत्री एका अगदी नव्या रूपात आणि वेशात पुढे सादर करणार आहे. या भावी कथानकात अनेक कलाकार विविध व्यक्तिरेखा साकारणार असून ज्येष्ठ अभिनेत्री अंजू महेंद्रू  ही त्यापैकी एक कलाकार आहे. गेल्या काही दशकांमध्ये अंजूने अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून विविध भूमिका रंगविल्या आहेत. आतापर्यंत शहरी, उच्चभ्रू, श्रीमंत महिलांच्या व्यक्तिरेखा सफाईदारपणे रंगविणारी अंजू या मालिकेत मात्र अगदी वेगळ्याच प्रकारची व्यक्तिरेखा रंगविणार आहे. ही व्यक्तिरेखा एका बिनधास्त, बेधडक आणि फटकळ बीजीची असून ती या वयातही मोटरबाईक वेगात चालवते.

अशी रंगतदार व्यक्तिरेखा उभी करण्यास आतुर झालेल्या अंजू महेंद्रूने सांगितले, “आतापर्यंत टीव्हीवर एकाच पध्दतीची, साचेबध्द बीजी दाखविली जात होती. त्यामुळे मला जेव्हा या बिनधास्त आणि बेधडक बीजीची भूमिका समजावून सांगण्यात आली, तेव्हा मी आनंदाने उडीच मारली! ती धडाकेबाज, फटकल आणि धडाडीची आहे. ती कोणत्याही परिस्थितीचा लगेचच ताबा घेते आणि कामाला लागते. आतापर्यंत सदैव मुळूमुळू रडणारी, रडकी बीजीच टीव्हीवरून दाखविण्यात आली आहे. ही भूमिका मी आजवर साकारलेल्या सर्व भूमिकांपेक्षा पूर्णपणे भिन्न असून मी ती पडद्यावर साकार करण्यास अत्यंत अधीर झाले आहे. त्यात मला विविध छटा दाखवून प्रेक्षकांना आनंदाश्चर्याचा धक्का देण्यास भरपूर वाव आहे. एक अभिनेत्री म्हणून मला सतत नवनवे प्रयोग करणं गरजेचं असून संतुष्टपणा टाळण्यासाठी स्वत:लाच आव्हान देणाऱ्या भूमिका स्वीकारल्या पाहिजेत. म्हणूनच या बीजीची भूमिका मला मिळाली, याचा मला फार आनंद वाटतो. या बीजीचा विक्षिप्तपणा, वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव आणि देहबोली रंगविण्याबरोबरच पंजाबी भाषेतील संवाद बोलताना मला मजा येत आहे.”

किंबहुना अंजूच्या बीजीचा मालिकेतील प्रवेशच बाईकवरून धडाकेबाज पध्दतीने होणार आहे. “बाईक चालविणं हा या बीजीच्या व्यक्तिमत्त्वाचा एक खास पैलू असून प्रेक्षकांना पहिला धक्का तिथेच बसेल. बाईक चालविणं ही खरोखरच एक थरारक गोष्ट असून मालिकेत मी सराईतासारखी बाईक चालविताना दिसावं, यासाठी मी चित्रीकरणाच्या मधल्या वेळेत ती चालविण्याचा सराव करीत असते. अशा या वैशिष्ट्यपूर्ण बीजीच्या भूमिकेमुळे भारतीय टीव्हीवर एक वेगळाच दृष्टिकोन मांडला जाईल, अशी मला आशा वाटते. मी आजवर कधीच बाईक चालविलेली नव्हती, त्यामुळे इतक्या कमी कालावधीत मला ते कसं जमेल, याची सुरुवातीला मला फार धास्ती वाटत होती. पण चित्रीकरण करतेवेळी मी मला दिलेल्या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन केलं- बाईकचा वेग किती राखायचा, तिचं हॅण्डल कसं धरायचं, चालत्या कॅमेर्‍्याबरोबर वेग कसा कायम राखायचा वगैरे सर्व गोष्टी मी अचूक पाळल्या. मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि ते करताना मला त्यात मुद्दाम मी काही खटाटोप करीत आहे, हे दाखवायचं नव्हतं. ते सहज, नैसर्गिक दिसावं, अशी अपेक्षा होती. माझ्या या नव्या अवताराचा प्रेक्षक मनापासून स्वीकार करतील, अशी मला आशा आहे,” असे अंजू म्हणाली. तसेच या मालिकेत ती पुन्हा एकदा महिमा मकवाणा हिच्याबरोबर काम करण्याची संधी मिळत असल्याचाही आनंद तिला झाला आहे; कारण यापूर्वी तिने महिमाबरोबर ‘रिश्तों का चक्रव्यूह’मध्ये तिच्या आजीची भूमिका साकारली होती. “ज्या कलाकारांबरोबर तुमचं छान जमतं, त्यांच्याबरोबर पुन्हा काम करायला मिळणं याचा आनंद वेगळाच असतो. तसंच प्रेक्षकांना आमच्यातील खटकेदार संवाद मजेदार वाटतील,” असे अंजू म्हणाली.

टॅग्स :मरियम खान रिपोर्टिंग लाइव्ह