कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत (Indrayani Serial) मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. कृष्ण जन्माष्टमी म्हणजे भक्ती, उत्साह आणि आनंदाचं प्रतीक. दरवर्षीप्रमाणे गावात साजरा होणारा हा सोहळा यंदा प्रेक्षकांसाठी अधिक खास ठरणार आहे. मंदिर सजावट, गावकऱ्यांचा उत्साह, पाळणा सजवण्याची लगबग, आणि श्रीकृष्णाच्या जन्माचे स्वागत करण्याची तयारी या सर्वात प्रत्येक पात्राचा आनंद द्विगुणित झालेला दिसून येणार आहे. यंदा कृष्ण जन्म मंदिरात साजरा होणार असून आनंदीबाई स्वतः पाळणा देणार आहेत. इंदू, शकुंतला आणि नारायणी कृष्ण जन्मासाठी गाणी गाणार आहेत.
अशातच आनंदाच्या वातावरणात अचानक मंदिरात भक्त दाम्पत्य येतं. बाहेर वादळ व पावसाचं वातावरण आहे. कृष्ण जन्म पाहण्यासाठी आलेली ती गर्भवती स्त्री अचानक वेदना जाणवू लागतात आणि तिचा प्रसूतीचा क्षण समीप येतो. इंद्रायणी आणि अधू तात्काळ तिच्या मदतीला धावून जातात. इंद्रायणी दिग्रसकर वाड्यात तिला घेऊन जाते आणि प्रसूतीत गुंतागुंत निर्माण होऊ नये म्हणून तिथेच बाळाला जन्म द्यावा असं सुचवते. अशा कठीण क्षणी इंद्रायणी, विठुरायाचा आशीर्वाद घेऊन त्या स्त्रीची प्रसूती घडवून कशी घडवून आणणार ? कोणत्या समस्या समोर येणार ? अधूची साथ तिला कशी मिळणार हे बघणे रंजक असणार आहे.