Join us  

"२५० रु टोल परवडणार का?" अटल सेतूच्या व्हिडिओवर चाहत्याचा प्रश्न; अक्षया नाईक म्हणते- २ तास टॅक्सीमध्ये बसणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 12:39 PM

"५० वर्ष जी गोष्ट फक्त कागदावर होती त्याला सत्यात आणलं", अटल सेतूसाठी अक्षया नाईकने मानले फडणवीसांचे आभार

अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सी लिंक अटल सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. २१. ८ किमीचा हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. या सेतूमुळे नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई हे दीड तासाचं अंतर अवघ्या २० मिनिटांत पार करणं शक्य होत आहे. त्यामुळेच या अटल सेतूची सर्वत्र चर्चा आहे. अनेक सेलिब्रिटीही अटल सेतूबाबत पोस्ट करत आहेत. मराठमोळी अभिनेत्री अक्षया नाईक हिनेदेखील अटल सेतूबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

अक्षयाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती अटल सेतूबाबत बोलताना दिसत आहे. या व्हिडिओतून तिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. "आपल्या मुंबईला आपण स्वप्नाची नगरी म्हणतो. पण, या स्वप्नाच्या नगरीत येणारा महत्त्वाचा अडथळा म्हणजे ट्राफिक. मुंबई ते नवी मुंबई प्रवासाला २ दोन तास लागायचे. या समस्येवर कृतीशील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात केली. गेली ५० वर्ष जी गोष्ट फक्त कागदावर होती त्याला सत्यात आणलं. त्यामुळे मुंबई ते नवी मुंबई हा २ तासांचा अवधी केवळ २० मिनिटांवर आला. यासाठी मुंबई आणि नवी मुंबईकरांकडून मी आभार मानते," असं अक्षया व्हिडिओत म्हणताना दिसत आहे. 

अटल सेतूवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांना सिंगल प्रवासासाठी तब्बल २५० रुपयांपासून १५८० रुपयांपर्यंतचा टोल भरावा लागणार आहे. यावरुन अक्षयाच्या व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट केली आहे. "ताई 250 रुपये टोल त्याचं काय? सर्व सामान्य लोकांना परवडेल का?", असा प्रश्न चाहत्याने विचारला आहे. चाहत्याच्या या प्रश्नावर अक्षयाने उत्तर दिलं आहे. अक्षया म्हणते, "2 तास टॅक्सीमध्ये वेळ घालवणार त्याचं मीटर नक्कीच वाढणार. तिथे वाचतात की. शिवाय स्वतःची गाडी असल्यास इंधन वाचणार, अर्थात त्याचे पैसे वाचणार. त्याहून अधिक तुमचा वेळ अजून वाचतो." 

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अक्षयाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मराठीबरोबरच अक्षयाने हिंदी मालिकांमध्येही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अक्षयाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.  

टॅग्स :शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूअक्षया नाईकटिव्ही कलाकार