'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag Serial) मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) यांचं १६ ऑगस्ट रोजी निधन झालं. त्या ६९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे. त्यामुळे मालिकेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अगदी काल-परवाच्या एपिसोडमध्ये त्यांची भूमिका मालिकेत पाहायला मिळत होती. खऱ्या आयुष्यात अचानक झालेली त्यांची एक्झिट अनेकांना स्वीकारता येत नाही आहे.
दरम्यान, ठरलं तर मग मालिकेत ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच बऱ्याच जणांना ती भूमिका कोणी साकारु नये असेही वाटत आहे. सोशल मीडियावर काही नेटकरी पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी अभिनेत्रींची नावे सुचवत आहेत. काही जणांनी रोहिणी हट्टंगडी यांचं नाव सुचवलं आहे. तर काहींनी शमा देशपांडे या भूमिकेसाठी योग्य असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने स्टार प्रवाह वरील शुभविवाह मालिकेतील आकाशच्या आजीला पूर्णा आजी म्हणून घ्या असा सुचवलय. तर काहींनी ज्योती चांदेकर यांच्याशिवाय पूर्णा आजी कोणीच छान साकारू शकत नाही, असंही म्हटलंय. त्यामुळे स्टार प्रवाह चॅनेल आणि ठरलं तर मग मालिकेची टीम पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची निवड करतील हे आगामी काळात समजेल.
निर्मात्या सुचित्रा बांदेकर म्हणाल्या...'ठरलं तर मग' मध्ये पूर्णा आजींच्या जागी कोण दिसणार याबद्दल काही ठरलंय का? यावर अभिनेत्री आणि निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "आम्ही अद्याप याबद्दल काहीच विचार केलेला नाही. आम्हाला आणि प्रेक्षकांनाही सावरायला थोडा वेळ हवा आहे. प्रेक्षकांच्या कमेंट्स आहेत की पूर्णा आजींच्या भूमिकेत त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला पाहू शकत नाही. त्यामुळे बघू, विचार करु. बघायला गेलं तर त्या स्वत: नाटकातल्या होत्या त्यांनाही माहित आहे की शो मस्ट गो ऑन!"