सायकल चोरीच्या गुन्ह्यानंतर आणखी एका गुन्ह्यासाठी स्वामी ओमची कोर्टात पेशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 14:47 IST
बिग बॉस सीजन-१० मध्ये आपल्या कारनाम्यांमुळे सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले स्वयंघोषित बाबा स्वामी ओम बाहेरील दुनियेतदेखील तेवढेच वादग्रस्त असल्याचे समोर ...
सायकल चोरीच्या गुन्ह्यानंतर आणखी एका गुन्ह्यासाठी स्वामी ओमची कोर्टात पेशी
बिग बॉस सीजन-१० मध्ये आपल्या कारनाम्यांमुळे सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले स्वयंघोषित बाबा स्वामी ओम बाहेरील दुनियेतदेखील तेवढेच वादग्रस्त असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सायकल चोरीच्या आरोपासाठी न्यायालयात हजर रहावे लागलेल्या स्वामी ओमला पुन्हा एका गुन्ह्यामुळे कोर्टात हजेरी लावावी लागली. धर्म प्रचारक जाकीर नाइक यांच्या पीस टीव्ही चॅनलच्या विरोधात प्रधानमंत्री निवासस्थानासमोर स्वामी ओम व त्यांच्या काही साथीदारांनी २०१२ मध्ये हिंसक प्रदर्शन केले होते. त्यावरून चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात स्वामी ओम, विष्णू गुप्ता यांच्यासह अन्य पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू असून, स्वामी ओम बिग बॉसच्या घरात असल्याने त्यांना न्यायालयात हजर राहता आले नसल्यानेच पोलिसांनी त्यांच्याविरोधात वॉरंट काढले होते. त्यामुळे त्यांना पटियाला हाउस न्यायालयात हजर रहावे लागले. महानगर दंडाधिकारी लवलीन यांनी गेल्या सोमवारी स्वामी ओम यांना दहा हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला. त्याचबरोबर या गुन्ह्यातील स्वामी ओमचा अन्य साथीदार भीम सिंह यालाही जामीन देण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मार्च २०१७ रोजी होणार आहे. स्वामी ओम यांच्याविरोधात दिल्लीतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत. नुकताच त्यांना सायकल चोरीच्या आरोपावरून साकेत न्यायालयात हजर रहावे लागले होते. त्यांच्या भावानेच त्यांच्याविरोधात सायकली चोरीचा आरोप केला होता. आता स्वामी ओमचे आणखी एक प्रकरण समोर आल्याने त्यांच्या वादग्रस्त व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना बघावयास मिळत आहे. दरम्यान, बिग बॉसने त्यांना गेल्या सोमवारीच घराबाहेर काढले होते. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर पुन्हा त्यांना ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश देण्यात आला आहे.