Join us

​सारेगमपा लिटल चॅम्पसचा सूत्रधार आदित्य नारायण केवळ टॉवेलवर पोहोचला होता लग्नात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 13:48 IST

लग्नात जायचे म्हटले की, लग्नात काय घालायचे याची तयारी कित्येक दिवस आधीपासून सुरू होते. पण आदित्य नारायण एका लग्नात ...

लग्नात जायचे म्हटले की, लग्नात काय घालायचे याची तयारी कित्येक दिवस आधीपासून सुरू होते. पण आदित्य नारायण एका लग्नात केवळ टॉवेलवर गेला होता असे कोणी तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? हो, आदित्य एका लग्नात चक्क टॉवेलवर गेला होता आणि त्याचे हे सिक्रेट नुकतेच सारेगमपा लिटल चॅम्पस या कार्यक्रमामुळे सगळ्यांना कळले. आदित्यनेच याविषयी प्रेक्षकांना सांगितले आहे. तो सांगतो, मी वर्षांतून एकदा हॉटेलमध्ये राहायला जातो. या वेळात मी कोणतेही काम करत नाही. हा वेळ फक्त माझ्यासाठी असतो. तसेच मी ज्या हॉटेलमध्ये राहात आहे, त्या हॉटेलची सेवा कशी आहे हे देखील मी पाहात असतो. मी नुकताच आंघोळ करून आल्यामुळे मी टॉवेल गुंडाळून बसलो होतो आणि टॉवेल गुंडाळूनच खाण्याच्या प्लेट मी माझ्या खोलीच्या दरवाज्यापाशी ठेवल्या होत्या. या प्लेट हॉटेलची मंडळी किती वेळात घेऊन जातात हे मला पाहायचे होते. पण त्याच दरम्यान खोलीचा दरवाजा बंद झाला आणि मी केवळ टॉवेलमध्ये माझ्या खोलीच्या बाहेर होतो. मी रिसेप्शनमध्ये जाऊन खोलीची दुसरी किल्ली घेऊन येण्याचा विचार केला. त्याचवेळी हॉटेलमध्ये एक लग्न होते आणि तिथे वरात आली होती. मी लिफ्टचा दरवाजा उघडून बाहेर आलो तर अतिशय सुंदर कपडे घातलेले वरातीतील लोक माझ्या समोर होते. त्या लोकांसमोर केवळ टॉवेलमध्ये उभा राहाताना मी शरमेने लाल झालो होतो. आणि तितक्यात त्या वरातीतील काही जणांनी मला ओळखले आणि वधू माझी मोठी चाहती असल्याचे सांगितले. यामुळे मला रिसेप्शनमध्ये जाणे अशक्य झाले. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण काहीच वेळात मी केवळ टॉवेल गंडाळून वधू-वरांच्या मध्ये बसलेलो होतो.