Join us  

"लालबागचा राजाच्या मिरवणुकीत बाळासाहेबांचा फोन आला अन्...", आदेश बांदेकरांनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 3:41 PM

"...आणि मी शिवसेनेत प्रवेश केला", आदेश बांदेकरांची राजकारणात एन्ट्री कशी झाली?

'होम मिनिस्टर' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले आणि महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजे अभिनेता आदेश बांदेकर. गेली १९ वर्ष 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमातून आदेश बांदेकर घराघरातील गृहिणींनी बोलतं करत आहेत. महाराष्ट्रातील घरोघरी वहिनींसाठी पैठणी घेऊन जाणारे भावोजी सगळ्यांचे लाडके आहेत. अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीप्रमाणेच आदेश बांदेकर राजकारणातही सक्रिय आहेत. 

आदेश बांदेकरांनी नुकतीच मुंबई तकला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अभिनय क्षेत्रातील प्रवास, वैयक्तिक आयुष्य याबरोबरच अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. आदेश बांदेकरांनी या मुलाखतीत त्यांची राजकारणात एन्ट्री कशी झाली, याचा किस्साही सांगितला. ते म्हणाले, "माझा जन्म अलिबागचा. त्यानंतर आईवडील गिरगावात आले. गिरगावात असताना कानावर बाळासाहेब ठाकरेंचे शब्द पडायचे. दसरा मेळाव्याला जाताना मी ढोल वाजवत जायचो. तेव्हा ती क्रेझ होती. राजकारण हा विषय माझ्यासाठी कधीच नव्हता. पण, कार्यकर्ता किंवा मित्र म्हणून अर्ध्या रात्री मदतीसाठी जाणं, हे रक्तातच होतं." 

"त्या काळात मी खरं तर काम करत होतो. रुपारेल मध्ये एकांकिकेचं दिग्दर्शन करत होतो. राजकारणात येईन असं कधीच वाटलं नव्हतं. लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत असताना मला एका अनोळखी नंबरवरुन फोन आला. तो फोन मी घेतला आणि समोरुन बाळासाहेबांना बोलायचं आहे, असा आवाज आला. बाळासाहेब तेव्हा मला भेटायचं आहे, कधी येतोस, असं म्हणाले. मी त्यांच्या घरी गेलो. मला आजही उद्धव ठाकरेंमधलं माणूसपण खूप आवडतं. राजकारणात इतका सक्रिय होईन असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी हे कधी ठरवलंही नव्हतं. पण, पक्ष आवडत होता. म्हणून मी हातात शिवबंधन बांधलं," असंही पुढे बांदेकरांनी सांगितलं. 

आदेश बांदेकरांनी शिवसेनेतून निवडणूकही लढवली होती. पण, या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आज ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सचिव आहेत. तर सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट समितीचे ते अध्यक्ष आहेत. 

टॅग्स :आदेश बांदेकरबाळासाहेब ठाकरेउद्धव ठाकरेशिवसेना