Join us  

चारच महिन्यात बिट्टी बिझनेस वाली ही मालिका बंद झाल्याने मालिकेच्या टीमवर आली आहे ही वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 1:24 PM

बिट्टी बिझनेस वाली या मालिकेतील कलाकारांना, तंत्रज्ञांनाना पैसे न मिळाल्याने सिन्टामध्ये त्यांनी प्रोडक्शन हाऊसविरोधात तक्रार नोंदवली आहे.

ठळक मुद्देआम्हाला प्रोडक्शन हाऊसकडून फेब्रुवारीत एक मेल आला होता. त्यात आमचे पैसे एप्रिलपर्यंत दिले जातील असे म्हटले होते. पण तसे घडले नाही. आता आमचे फोन उचलणे अथवा आमच्या मेसेजना रिप्लाय देणे त्यांनी पूर्णपणे बंद केले आहे.

बिट्टी बिझनेस वाली ही मालिका प्रेक्षकांना अँड टिव्हीला पाहायला मिळाली होती. सुखवस्तू कुटुंबातील मुलगी अथवा महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे का महत्त्वाचे आहे? हे प्रेक्षकांना या मालिकेत दाखवण्यात आले होते. या मालिकेत बिट्टी या स्वतंत्र व्यक्तिमत्त्त्व असलेल्या नायिकेची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रकृती मिश्राने साकारली होती तर अभिषेक बजाज तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. बिट्टी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याच्या हेतूसह एक पानाचे दुकान सुरू करण्याचा विचार करते अशी या मालिकेची कथा होती. पण या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने या मालिकेला केवळ चार महिन्यात गाशा गुंडाळावा लागला. ही मालिका सप्टेंबरमध्ये बंद झाली. पण या मालिकेतील कलाकारांना आणि तंत्रज्ञानांना अद्याप त्यांचे पैसे मिळालेले नाहीत.

बिट्टी बिझनेस वाली या मालिकेतील कलाकारांनी सिन्टा (सिने अँड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशन) ला या गोष्टीत लक्ष देण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांना लवकरात लवकर त्यांचे पैसे न मिळाल्यास या मालिकेचे निर्माते राकेश पासवान यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्याचे ठरवले आहे. याविषयी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्रकृतीने सांगितले की, आम्ही सगळेच गेल्या काही दिवसांपासून राकेश पासवान तसेच त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमधील मंडळींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्यांच्याकडून आम्हाला काहीही प्रतिसाद मिळत नाहीये. मी खूप आजारी असल्याने मला पैशांची गरज होती. तसेच मी ही मालिका सुरू झाल्यानंतर घर घेतले. त्यामुळे मी त्यांना गेल्या काही महिन्यांपासून पैशांसाठी सत विचारत आहे. माझे सात लाख रुपये त्यांनी अद्याप दिलेले नाहीत. आम्ही सात महिने चित्रीकरण केले. पण आम्हाला केवळ एक महिन्याचेच पैसे मिळाले. कलाकार, तंत्रज्ञ आमच्या सगळ्यांचेच पैसे देणे बाकी आहेत. आम्हाला प्रोडक्शन हाऊसकडून फेब्रुवारीत एक मेल आला होता. त्यात आमचे पैसे एप्रिलपर्यंत दिले जातील असे म्हटले होते. पण तसे घडले नाही. आता आमचे फोन उचलणे अथवा आमच्या मेसेजना रिप्लाय देणे त्यांनी पूर्णपणे बंद केले आहे. आम्ही काही महिन्यांपूर्वी सिन्टामध्ये जाऊन याविषयी सांगितले. आम्हाला पैसे न मिळाल्यास आम्ही पोलिसांकडे तक्रार नोंदवणार आहोत. 

यावर राकेश पासवानने म्हटले आहे की, ही मालिका खूपच कमी वेळात बंद झाल्याने मला खूप नुकसान सहन करावे लागले आहे. पण मी लवकरात लवकरत सगळ्यांचे पैसे परत करेन. 

टॅग्स :टेलिव्हिजन