झी मराठीचे (Zee Marathi) प्रेक्षक सध्या जाम खुश्श असणार, असं म्हणायला हरकत नाही. होय, कारण या महिन्यात एक दोन नाही तर पाच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या पाचही मालिकांच्या प्रोमोंनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वाधिक चर्चा आहे ती ‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliy )या मालिकेची. मालिकेचे प्रोमो अक्षरश: धडकी भरवणारे आहे. मालिकेच्या कथानकाचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण हो, या मालिकेत मुख्य भूमिका साकारणा-या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा मात्र झालाये.आत्तापर्यंतच्या ‘ती परत आलीये’च्या प्रोमोमध्ये फक्त ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे दर्शन घडले होते. पण आता या मालिकेतील मुख्य अभिनेत्याचे नावही समोर आले आहे. अभिनेता श्रेयस राजे (Shreyas Raje) या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे.
श्रेयस हा यापूर्वी अनेक मालिकांमध्ये झळकला. मात्र ‘ती परत आलीये’ मालिकेत तो प्रथमच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. म्हणजे ही त्याची मुख्य भूमिका असलेली पहिली मालिका आहे.
‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत देशद्रोह्याची भूमिका साकारली होती. त्याआधी श्रेयस ‘मोलकरीण बाई’ या मालिकेत झळकला होता. याशिवाय श्रेयसने जिगरबाज, भेटी लागी जीवा या मालिकांमध्येही काम केले आहे. बाबांची शाळा या चित्रपटातही त्याने भूमिका साकारली आहे.
प्रोमो पाहुन फुटेल घाम
‘ती परत आलीये’ चा नवा प्रोमो पाहून तुम्हालाही धडकी भरेल. होय, या प्रोमोत सुरूवातील दिसतात ते एका भयावह बाहुलीचे दोन भयानक डोळे, त्यानंतर दिसतात ते तिचे ओठ आणि मग दिसतो तो तिचा चेहरा. या बाहुलीची तुलना अनेकांनी अॅनाबेलसोबत केली आहे. येत्या 16 ऑगस्टपासून रात्री 10.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.