Join us

​हा अभिनेता पुन्हा एकदा दिसणार नारदाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 17:10 IST

पौराणिक मालिकेत एखादी भूमिका साकारली की, त्याच भूमिकेचा ठपका त्या कलाकारावर बसतो असे म्हटले जाते. त्या भूमिकेतून बाहेर पडायला ...

पौराणिक मालिकेत एखादी भूमिका साकारली की, त्याच भूमिकेचा ठपका त्या कलाकारावर बसतो असे म्हटले जाते. त्या भूमिकेतून बाहेर पडायला कलाकाराला खूप जास्त वेळ जातो. पण काही कलाकार आपण साकारत असलेल्या भूमिकेत प्रेक्षकांना काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न करत असतात. विजय बदलानीने याआधी रामायण या मालिकेत नारदमुनीची भूमिका साकारली होती. पण तो आता पुन्हा एकदा याच भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कर्मफल दाता शनी ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांकडून या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेच्या कथानकाला कलाटणी देण्यासाठी आता विजयची एंट्री होणार आहे. विजयने स्पेशल 26, माय नेम इज खान यांसारख्या चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिका खूपच वेगळ्या होत्या. आता तीन वर्षांनंतर विजय पुन्हा एकदा नारदाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण या मालिकेत तो साकारत असलेला नारद हा खूप वेगळा असल्याचे त्याचे म्हणणे आहे. याविषयी विजय सांगतो, "मी याआधीदेखील नारदाची भूमिका साकारली असली तरी या दोन्ही मालिकांची कथा आणि त्यामधील माझी भूमिका ही पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे मी तीच भूमिका पुन्हा साकारत आहे असे मला वाटत नाहीये. या मालिकेत काम करण्यास मी खूपच उत्सुक आहे. प्रेक्षकांनी मी साकारलेल्या नारद या भूमिकेला भरभरून प्रेम दिले होते. पुन्हा एकदा ते माझ्या या भूमिकेला पसंती देतील अशी मला आशा आहे."