Join us

"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 11:40 IST

प्रिया आजारपणातही काम करत होती...अभिजीतने सांगितलं नक्की काय घडलं

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं ३१ ऑगस्ट रोजी निधन झालं. कॅन्सरने तिचा जीव घेतला. प्रियाच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला होता. तिला कॅन्सर होता हेही तिने बाहेर येऊ दिलं नव्हतं. अगदी मोजक्या लोकांनाच याबद्दल माहित होतं. प्रिया शेवटची 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत दिसली होती. कॅन्सरचं निदान झाल्यामुळेच तिने ही मालिका अर्ध्यातच सोडली होती. मालिकेतील तिचा सहकलाकार अभिनेता अभिजीत खांडकेकरने प्रियाच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत खांडकेकर म्हणाला, "एका आजारपणाच्या निमित्ताने चेकअपवेळी काही गोष्टी समोर आल्या. ऑपरेशन वगैरे सगळ्याला आपण साहजिकच घाबरतो. तेव्हा प्रियाने मला पहिल्यांदा धास्तीने हे सांगितलं की मला असं असं वाटतंय. मग मी नॉर्मल आपण मित्र धीर देतो तसं तिला 'सगळं ठीक होईल घाबरु नको. हा आजार बरा होतो. डॉक्टरला विचार आपण ट्रीटमेंट सुरु करु असा धीर दिला. शंतनू आणि तू प्रयत्न करतच आहात. तू नक्की बरी होशील.' असा मी तिला धीर दिला. फक्त त्यावेळेला मला एक गोष्ट करायला लागली ती म्हणजे ही गोष्ट सेटवर कोणालाही कळू देऊ नको असं तिने मला सांगितलं. पण होतंय काय की सेटवर एक कलाकार का उगीच दमतीये, का सुट्ट्या घेतीये यावरुन अनेकजण हाच अंदाज लावतात की घरी पूजा असेल किंवा दुसरं शूट असेल. पण प्रिया का सुट्ट्या घेतीये नाटकाचा प्रयोगही नाही असे प्रश्न लोकांना पडायचे."

"प्रियाला शक्य तितकं सगळ्यांपासून लपवायचं होतं. त्यात मी कायमच तिच्या बरोबर होतो. शंतनू नंतर मीच होतो ज्याला सगळंच माहित होतं. त्यामुळे मग आम्ही तिला जास्तीत जास्त कंफर्टेबल वाटेल आणि काम करता येईल असा आमचा प्रयत्न असायचा. पण नंतर ट्रीटमेंटमुळे तिची तब्येत ढासळतीये हे दिसत होतं. मला आठवतंय तेव्हा प्रिया दोन व्यावसायिक नाटक, डेली सोप करत होती. मालिकेत तिची मोनिका ही भूमिका होती जिचे आक्रस्ताळेपणाचे सीन्स, जोरात बोलणं हे सगळं होतं. एका वेळेला ही मुलगी अशा ट्रीटमेंट घेऊन जिथे माणसं दिवस दिवस झोपून राहतात तेव्हा ती स्वत: ड्राईव्ह करुन यायची. शूट करायची. दोन व्यावसायिक नाटकांचे प्रयोग करायची ज्यातही तिची मुख्य भूमिका होती. पल्लेदार वाक्य सफाईदारपणे घेणारी प्रिया शेवटच्या काही दिवसात तिला दोन वाक्यही बोलणं कठीण झालं होतं. आता ते आठवलं की असं होतं की प्रिया अजून थोडं असायला हवं होतं. पण कदाचित ती सुटली हेच योग्यही होतं."

टॅग्स :अभिजीत खांडकेकरप्रिया मराठेमराठी अभिनेता