Join us  

आई कुठे काय करते: 'उर्मट माजोर्डा स्वार्थी...'; अनिरूद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळींनी स्वत:लाच केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 4:09 PM

अनिरूद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत स्वतःला ट्रोल केले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत सध्या आशुतोषची एन्ट्री झाली आहे. आशुतोषपुढे अनिरुद्ध निरुत्तर झाल्याचे नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत पाहायला मिळाले. दरम्यान आता या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत स्वतःला ट्रोल केले आहे.अभिनेता मिलिंद गवळीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आई कुठे काय करते मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिले की, "Success is always not a fluke" किती महत्त्वाचं वाक्य आशुतोष केळकर म्हणतोय, "आशुतोष पुढे अनिरुद्ध निरुत्तर" खरंच अनिरुद्ध सारख्या माणसांकडे आशुतोष केळकर यां सारख्या च्या प्रश्नांची कधीच उत्तरं असतात? आशुतोष केळकर सारखी जी माणसं असतात, साधे सरळ प्रामाणिक असतात त्यांना आनंदी आयुष्य जगणं किती सोपं जातं, आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यशस्वी होत जातात आणि त्या यशाचा त्यांना गर्व नसतो, आशुतोष केळकर असाच गोड माणूस, आणि अशी माणसं आपल्याला हवीहवीशी वाटतात, आपल्याला म्हणजे फक्त अनिरुद्ध सारख्यांना नाही आवडत कारण त्यांच्यापेक्षा ते सुपिरियर असतात सगळ्याच बाबतीत, तेच अनिरुद्धला सहन होत नाही. खरेच किती कमी दिवसात आशुतोष केळकर लोकांचं आवडतं कॅरेक्टर झालं, खरंतर मलाही ते कॅरेक्टर खूपच आवडतात आणि कॅरेक्टर रंगवणारा ओमकार गोवर्धन हा पण खूप आवडतो,तो तसाच आहे आशुतोष केळकर सारखा, कधी कधी कलाकार आणि ते कॅरेक्टर अगदी एकरूप होतो, तसा आशुतोष केळकर या कॅरेक्टरमध्ये ओमकार फिट बसला.

मिलिंद गवळीने पुढे म्हटले की, जसा अविनाशच्या कॅरेक्टरमध्ये आमचा शंतनु मोघे फिट बसला. सिरीयलच्या कास्टिंग डिपार्टमेंट म्हणजेच नमिता वर्तक, रवी कर्मारकर यांचं खरं कौतुकच आहे, एवढ्या सगळ्या कलाकारांमध्ये बरोबर त्या कॅरेक्टरला सूट होणारा कलाकार शोधायचा, किती कठीण काम आहे.आमचा शंतनु मोघे अतिशय गोड प्रेमळ स्वभावाचा म्हणजे अविनाश सारखा अगदी तसाच, ओमकार गोवर्धन असाच सज्जन छान हुशार अगदी आशुतोष केळकर सारखा. माझ्या कधी कधी मनात विचार येतो की माझं कास्टिंग करताना अनिरुद्ध देशमुख सारख्या व्यक्तिरेखेचा कास्टिंग करतात मिलिंद गवळी सुचला, म्हणजे माझ्या मध्ये अनिरुद्ध देशमुख त्यांना दिसला, नक्कीच दिसला असणार, उर्मट माजोर्डा स्वार्थी. बापरे हे सगळे गुण माझ्यात आहेत? त्यांना दिसले? मिलिंद गवळी आत्मपरिक्षण करणं गरजेचे आहे, असे मिलिंद गवळीने पोस्टमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिका