Join us  

सचिन तेंडुलकरच्या शाळेत शिकले आहेत मिलिंद गवळी, म्हणाले- "त्याची बॅटिंग बघून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 4:10 PM

"शिवाजी पार्कमध्ये आचरेकर सर आम्हाला...", सचिन तेंडुलकरच्या गुरूंकडून मिलिंद गवळी घ्यायचे क्रिकेटचे धडे

'आई कुठे काय करते' मध्ये अनिरुद्धची भूमिका साकारणारे मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारून त्यांनी एक काळ गाजवला. त्यांचा चाहता वर्ग मोठा असून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. मिलिंद गवळी अनेकदा पोस्ट शेअर करत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अपडेट देत असतात. त्यांच्या पोस्ट या कायमच चर्चेचा विषय असतात. मिलिंद गवळी अनेक किस्सेही पोस्टमधून शेअर करतात. 

आतादेखील मिलिंद गवळींच्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे. मिलिंद गवळींनी  त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते क्रिकेट खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये मिलिंद गवळींनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचा उल्लेखही केला आहे. 

मिलिंद गवळींची पोस्ट

रविवार सुट्टीचा दिवस. माझा भाचा शिवम म्हणाला, “मामाजी दर रविवारी आम्ही सगळे मित्र क्रिकेट खेळतो आमच्याबरोबर क्रिकेट खेळणार का ?” जवळजवळ 20-25 वर्षानंतर कोणीतरी मला विचारलं “क्रिकेट खेळणार का ?"

 

आज सकाळी एक पुण्यात meeting होती, लगेच मी ती meeting postponed केली आणि पहाटे ५.०० वाजता आम्ही रावेतला निघालो. ६ वाजेपर्यंत एक एक शिवमचे मित्र जमा व्हायला लागले. कोणी वकील तर कोणी businessman, तर कोणी student, पण actor या जमातीमधला मी एकटाच होतो...कुणी मला मामा म्हणे कोणी मला काका म्हणे...पण त्यांच्यामध्ये एक उंच असा मुलगा होता त्याचं नाव होतं अनिरूद्ध. कोणी ही त्याला हाक मारली की मला उगाचच वाटत होतं की मलाच बोलतायत...

जवळजवळ 20-25 वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात उतरलो होतो. क्रिकेटची बॅट हातात धरली होती. माझे जुने शिवाजी पार्क मधले दिवस आठवले...असंच रविवारी सकाळी आचरेकर सर कॅच प्रॅक्टिस द्यायचे. कदाचित त्या शाळेमधल्या प्रॅक्टिसमुळेच आज तीन कॅच पकडता आल्या. आमच्या शाळेमध्ये म्हणजे शारदाश्रम विद्यामंदिर दादर मध्ये विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांनी admission घेतल्यानंतर त्यांची बॅटिंग बघून माझ्या लक्षात आलं होतं की हा खेळ “अपने बस की बात नही है ".

इतक्या वर्षानंतर आज परत या पोरांना बघून सुद्धा तेच वाटलं की हे “आज भी अपने बस की बात नही है " आजकालची मुलं ही खूपच छान खेळतात....turf club च्या जाळ्या इतक्या उंच होत्या तरीसुद्धा सात बॉल हरवले. या 20-22 मुलांचा मी आभारी आहे कारण मी त्यांच्यापेक्षा वयाने खूपच लहान असून सुद्धा त्यांनी मला आज खेळायला घेतलं. या सगळ्यांच्या उज्वल भविष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.

मिलिंद गवळींची ही पोस्टही चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. या पोस्टवरही चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असल्याचं दिसत आहे. 

टॅग्स :मिलिंद गवळीसचिन तेंडुलकर