Join us  

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री हिंदी मालिकेत झळकणार, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 11:10 AM

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं नशीब उजळलं, हिंदी मालिकेत मिळालं काम

‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. स्टार प्रवाहवरील या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलंसं केलं होतं. सुरुवातीपासूनच ही मालिका लोकप्रियता आणि टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी होती. या मालिकेतील सगळ्याच पात्रांवर प्रेक्षक आजही तितकंच प्रेम करतात. अभिनेत्री अपूर्वा गोरेदेखील याच मालिकेमुळे घराघरात पोहोचली. या मालिकेतील ईशा या पात्राने तिला लोकप्रियता मिळवून दिली.

आता अपूर्वा तिच्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. अपूर्वाला हिंदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे. स्टार प्लसवरील ‘बातें कुछ अनकही सी’ या मालिकेत अपूर्वा महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अपूर्वाने ही गुडन्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. ‘आई कुठे काय करते’मधील लाडक्या ईशाला हिंदी मालिकेत बघण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

“नवीन सुरुवात, नवीन अध्याय, नवीन साहस, चला सुरुवात करुया...कुणाल आणि वंदनामधील प्रेमाच्या गोष्टीचे साक्षीदार होऊया. ‘बातें कुछ अनकहीं सी’ २१ ऑगस्टपासून सोमवार ते रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्लसवर”, असं अपूर्वा पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत देशमुख कुटुंबीयांच्या घरी ईशा आणि अनिषच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. अपूर्वा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती फोटो शेअर करताना दिसते. तसंच नवीन प्रोजेक्टबाबत अपूर्वा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती देत असते.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामराठी अभिनेताटिव्ही कलाकारस्टार प्लसस्टार प्रवाह