Join us  

'मास्टरशेफ इंडिया'मध्ये ७८ वर्षीय उर्मिला जमनादास अशर यांनी पटकावलं टॉप ३६ मध्ये स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 5:30 PM

‘गिर उठ पर रुक मत’ हे ब्रीद मिरवणाऱ्या उर्मिला अशर म्हणजे आपणा सर्वांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पाककला आधारित फॉरमॅट शो मास्टरशेफ इंडिया(Masterchef India)चे ऑडिशन एपिसोड दाखवण्यात आले, ज्यामध्ये परीक्षक आणि सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार, गरिमा अरोरा आणि विकास खन्ना देशाच्या विविध भागांतून अशा उत्तमोत्तम होम कुक्सचा शोध घेतला, जे मास्टरशेफ इंडियाचा किताब मिरवण्यास पात्र असतील. या सगळ्यांत उठून दिसलेली स्पर्धक म्हणजे ७८ वर्षांच्या होम कुक उर्मिला जमनादास अशर. मुंबईच्या उर्मिला यांना कुकिंगची फारच आवड आहे. या स्पर्धेत दाखल होताना त्या फारच उत्साहात होत्या. आपले स्वप्न साकार करणार्‍या या संधीचे सोने करण्याची मनीषा बाळगून त्या स्पर्धेत उतरल्या आहेत. ‘गिर उठ पर रुक मत’ हे ब्रीद मिरवणाऱ्या उर्मिला अशर म्हणजे आपणा सर्वांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे. या स्पर्धकाचे एक यूट्यूब चॅनल आहे – “गुज्जू बेनना नास्ता”, ज्यावर त्या पाककृती आणि ते बनवतानाचे व्हिडिओ शेअर करतात, जे पाहून तोंडाला पाणीच सुटते. आपल्या मुलांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या आता आपल्या पती आणि नातू यांच्यासोबत राहात आहे. आपले लहानपणीचे स्वप्न पूर्ण करत त्यांनी मास्टरशेफ इंडियामध्ये यशस्वीरित्या प्रवेश मिळवला आहे. आपले परीक्षक शेफ रणवीर ब्रार, गरिमा अरोरा आणि विकास खन्ना यांच्यासाठी त्या लोकप्रिय गुजराती पदार्थ ‘पात्रा’ म्हणजे आळूच्या वड्या बनवताना दिसणार आहेत.

 त्या टॉप ३६ मध्ये तर आल्या आहेत पण आता त्या टॉप १६ मध्ये येण्यासाठी स्पर्धा करताना दिसतील. हे निवडलेले ३६ स्पर्धक ‘कुक-ऑफ’ मध्ये एकमेकांना टक्कर देतील. यावेळी, त्यांना काही ठराविक घटक पदार्थ देण्यात येईल, ज्यांचा उपयोग करून त्यांना एखादी डिश बनवावी लागेल. परीक्षक TIP म्हणजे टेस्ट, इनोव्हेशन आणि प्रेझेंटेशनच्या निकषावर त्यांची पाककृती पारखतील. कुक-ऑफचा आपला अनुभव सांगताना उर्मिला अशर म्हणाल्या की, टॉप ३६च्या यादीत माझे नाव आल्याबद्दल मी धन्यता अनुभवते आहे. टॉप १६ मध्ये दाखल होऊन माझ्या नावाचा अॅप्रन मी मिळवू शकेन अशी मला आशा आहे.