Join us

लग्नाळू मुलगा अन् नकार देणारी मुलगी, 'हॅशटॅग तदेव लग्नम' म्हणत होईल का शुभमंगल सावधान?

By कोमल खांबे | Updated: December 20, 2024 15:27 IST

लग्नाची नवी परिभाषा सांगणारा 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा चित्रपट येत्या २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक आणि कलाकारांनी 'लोकमत'शी साधलेला खास संवाद.

लग्नसराईच्या धामधुमीत लग्नावर भाष्य करणारा 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर आनंद गोखले यांनी दिग्दर्शन केलं आहे. लग्नाची नवी परिभाषा सांगणारा हा चित्रपट येत्या २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक आणि कलाकारांनी 'लोकमत'शी साधलेला खास संवाद.

या विषयावर सिनेमा का करावासा वाटला? तेजश्री-सुबोधची अनुरुप जोडी कशी शोधली? 

दिग्दर्शक: दोन काळांना दर्शवणारा हा सिनेमा आहे. म्हणूनच सिनेमाचे नावही 'हॅशटॅग तदेव लग्नम' असे आहे. लग्न किंवा प्रेमाला काळाचे बंधन नाही. पण, काळानुरुप त्यात बदल झालेला दिसतो. लग्न हा असा विषय आहे, जो सगळ्यांच्या संबंधित आहे. या सिनेमातून दोन्ही पिढ्यांचे विचार मांडण्याचा आणि त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सुबोध आणि तेजश्रीबद्दल सांगायचे तर ही अनुरुप जोडी सिनेमाच्या लिखाणातच सापडली. अथश्री म्हणजे सुबोध आणि गायत्री म्हणजे तेजश्री हे सुरुवातीपासूनच डोक्यात होते. त्यामुळे सिनेमात मला हे दोघेच हवे होते. सिनेमाची कथा ऐकवल्यानंतर दोघांनीही होकार दिला. आणि सगळ्या गोष्टी हव्या होत्या तशा जुळून आल्या. 

अथश्री या तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?

सुबोध: या सिनेमात मी अथश्री ही भूमिका साकारत आहे. अतिशय गोड, साधा, सरळ आणि आताच्या काळात फारसा स्मार्ट नसलेला असे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर आहेत. लग्न करायला त्याला उशीर झाला आहे. पण, आता तो लग्नाळू अवस्थेत आहे आणि त्याला आता खरेच लग्न करायचे आहे. भाषेचा प्राध्यापक असलेल्या या अथश्रीला आजपर्यंत एकाही मुलीने होकार दिलेला नाही. तरीही तो नेहमी त्याच उत्साहाने मुलगी बघायला जातो, अशी ही भूमिका आहे. 

सिनेमातील तू साकारलेल्या पात्राचं वैशिष्ट्य काय?

तेजश्री : अथश्रीच्या अगदी उलट सिनेमात मी साकारलेली गायत्री आहे. तिला अजिबातच लग्न करायचे  नाही आहे. मुलगा भेटला की १० मिनिटांत नकार देऊन निघून जाईल, अशी तिला खात्री आहे. पण, अथश्री आणि गायत्रीच्या बाबतीत ग्रहताऱ्यांचे काहीतरी वेगळे ठरलेले आहे. त्यामुळे तशा काही गोष्टी घडत जायचे पाहायला मिळते. आईवडिलांवर प्रेम करणारी, बाहेरून एकदम कठोर दिसणारी अशी ही गायत्री आहे. 

लग्नसंस्थेवरून आजच्या पिढीचा विश्वास उडत चाललाय असे वाटते का? 

सुबोध : आपल्या आईवडिलांच्या काळात इतक्या सहजपणे प्रेमविवाह होत नव्हता. एकमेकांच्या घरची परिस्थिती बघून लग्न ठरवली जायची. माझ्या आईवडिलांचे अरेंज मॅरेज होते. आवडीनिवडीबद्दल सांगायचे झाले तर कुणाच्या आवडीनिवडी जुळतात? लग्न ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, त्याच्यासाठी सोडलेली एखादी गोष्ट त्याग असू शकत नाही. त्याच्याबरोबर आपल्याला राहायला आवडते, म्हणून त्याला न आवडणारी गोष्ट आपण सोडतो. ही तयारी आताच्या पिढीची आहे की नाही, हे सांगणे कठीण आहे.

तेजश्री : मला असे वाटते की मॅट्रोमोनियल साईट्समुळे आपल्याकडे खूप पर्याय आहेत. आणि जेव्हा आपल्याकडे खूप पर्याय असतात तेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी १०० टक्के देत नाही. एखाद्या व्यक्तीला भेटतानाही तुम्ही चार जणांचे प्रोफाईल चेक करत असता. त्यामुळे मला असं वाटतं की गरजेपेक्षा आपल्याकडे खूप जास्त पर्याय उपलब्ध झाले आहेत.

टॅग्स :तेजश्री प्रधान सुबोध भावे मराठी अभिनेता