Join us  

रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचा जगभरात डंका; ९ दिवसांत जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 11:54 AM

Swantryaveer Savarkar Box Office Collection : केवळ देशातच नाही तर जगभरातही 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा २२ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला. वीर सावरकर यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर मांडलेल्या या सिनेमात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमातील रणदीप हुड्डाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमात त्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका उत्कृष्टरित्या वठवली आहे. या सिनेमाचीही सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनीही या सिनेमाचं कौतुक करत पोस्ट शेअर केल्या आहेत. 

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. ठिकठिकाणी थिएटरमध्ये या सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत. केवळ देशातच नाही तर जगभरातही 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात ११.३७ कोटींची कमाई केली आहे. तर नवव्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १.५१ कोटींचा गल्ला जमवला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाने आत्तापर्यंत देशात १३.९५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात १८.६८ कोटींची कमाई केली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर हा सिनेमा मराठीतही प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठीत स्वातंत्र्याचा वीर इतिहा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शुक्रवारी २९ मार्चपासून 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा मराठीतून प्रदर्शित केला गेला आहे. 

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात काम करण्याबरोबरच या सिनेमाचं दिग्दर्शनही रणदीप हुड्डाने केलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. या सिनेमात अभिनेत्री अंकिता लोखंडेही झळकली आहे. अंकिताने या सिनेमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :रणदीप हुडाअंकिता लोखंडेसिनेमा