Join us

क्या बात! सुपरस्टार असूनही स्वप्निल करतो घरातील कामं, म्हणाला- "मी एकुलता एक असल्याने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:16 IST

स्वप्निलने नुकतंच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या खास शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सेलिब्रिटी असूनही घरी काम करण्याबाबत स्वप्निलने त्याचं मत मांडलं.

स्वप्निल जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केलेल्या स्वप्निलने हिंदी कलाविश्वदेखील गाजवलं आहे. स्वप्निलने नुकतंच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या खास शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने पर्सनल लाइफ आणि फिल्मी करियरबाबत दिलखुलास गप्पा मारत अनेक किस्से सांगितले. यावेळी सेलिब्रिटी असूनही घरी काम करण्याबाबत स्वप्निलने त्याचं मत मांडलं.

तो म्हणाला, "माझे बाहेर खूप लाड व्हायचे. पण, घरी नाही. आजही, मला घरी एक काम करावंच लागतं. हे मी इंटरव्ह्यू म्हणून सांगत नाहीये. एकतर कचरा काढणं, किंवा भांडी लावणं, कपड्यांच्या घड्या करणं...देवाच्या कृपेने घरात ३-४ माणसं काम करायला आहेत. पण, तो शिस्तीचा भाग आहे. तुझं घर आहे हे तुला वाटलं पाहिजे. म्हणून सकाळी उठल्यावर चादरीच्या घड्या घालून बेड नीट करून रुमच्या बाहेर यायचं. कुठलं तरी एक काम आजही मी करतो. मला संध्याकाळी मेसेज येतो की कपडे वाळत घालायचे ठेवून दिलेत आलास की वाळत घालून टाक. किंवा वाळत घातलेले कपडे काढलेत पण झोपायच्या आधी घड्या करून ठेव". 

"मी एकुलता एक मुलगा होतो. त्यामुळे पहिल्यापासून आईने असं वाढवलंय की मी मुलगा आहे. हे माझं काम नाही. हे तर मुली करतात वगैरे हे कधीच नव्हतं. मी असं बोललो तर आई अजूनही मला फटकवेल. त्यामुळे मला भांडी घासता येतात. मला धुणं धुता येतं. मुलांचं लंगोट बदलता येतं. मला शी-शू साफ करता येते. दोन्ही मुलांना अंघोळ मी घातली आहे. मला पावडर टीट लावता येते. रडलेल्या मुलाला झोपवता येतं. मान धरलेली बाळ नसेल तर त्याला घेता येतं. मला घरची सगळी कामं येतात. मला स्वयंपाक खूप येत नाही. पण, भाजी चिरून दे किंवा नंतरचा ओटा आवरुन घे. हे मी आजही करतो. याला पर्याय नाही. याच्यात मी काहीतरी ग्रेट करतोय, अशी भावनाच घरी नाही" असंही तो म्हणाला. 

टॅग्स :स्वप्निल जोशीमराठी अभिनेतासेलिब्रिटी