मराठी चित्रपटसृष्टीतला अभिनेता सुव्रत जोशी सोशल मीडियावर सक्रीय असून तो नेहमी या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमधून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होतं. येत्या अमावस्येला घेऊन येत आहोत जन्म आणि मृत्यू यांच्या मधल्या दरीत अडकलेल्या विदेहीच्या भीतीदायक गोष्टी..."विदेही विनाशक अगस्त्य" ने दिलेल्या अंधाराच्या हाका! असं कॅप्शन दिलं आहे.
"अंधाराच्या हाका" नावाप्रमाणेच रसिकांचे कुतूहल चालविणारे असून ‘स्टोरीटेल’वर हे ऑडिओबुक चाहत्यांची उत्कंठा वाढविण्यासोबतच त्यांना गहन आणि थरारक अनुभूती देणार आहे. अष्टपैलू युवा अभिनेता सुव्रत जोशीच्या सहजसुंदर श्राव्यभिनायातून आणि लेखक संवेद गळेगावकर यांच्या मांडणीतून ‘अंधाराच्या हाका’ मधील नायक अगस्त्य मुझुमदार सुष्ट आणि दुष्ट शक्तींना गुंगारा देत त्यांचा कसा सामना करतो हे ऐकणे रंजक ठरणार आहे.
"अंधाराच्या हाका" या अत्यंत वेगळ्या ऑडिओ बुकचे लेखक संवेद गळेगावकर म्हणतात.. "हे माझं तिसरं पुस्तक स्टोरीटेलवर आलंय. या निमित्तानं जन्म आणि मृत्यु यांच्या दरम्यान अडकलेल्या विदेहींशी संवाद साधु शकणारा एक नवा नायक, अगस्त्य मुझुमदार, श्रोत्यांसमोर येत आहे. ऎन मध्यरात्री उमटणाऱ्या अमानविय आकृत्या, पडक्या वाड्यातून ऎकू येणारी कुजबुज, पावलांची उरफाटी सरसर यांचे रंगतदार किस्से न ऎकलेला माणूस विरळाच. अज्ञाताची भिती माणसाला कायमच आकर्षित करत आलेली आहे.