Join us  

Suniel Shetty, KL Rahul : “मी त्याला क्रिकेटबद्दल...” जावई के. एल. राहुलच्या खराब फॉर्मबद्दल सुनील शेट्टी स्पष्टच बोलला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 10:34 AM

Suniel Shetty , KL Rahul : गेल्या काही महिन्यांपासून अण्णाचा जावई के. एल. राहुल खराब फॉर्ममुळे चर्चेत आहेत. सततच्या खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी ठरतोय. एका मुलाखतीत अण्णाला जावयाच्या या खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारला गेला.

बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टी (Suniel Shetty) सध्या हंटर या आपल्या आगामी सीरिजमुळे चर्चेत आहे. सध्या अण्णा या सीरिजच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. साहजिकच सर्व प्रमोशनल इव्हेंटमध्ये अण्णा सीरिजबद्दल भरभरून बोलतोय. खासगी आयुष्याबद्दलही अनेक खुलासे करताना दिसतोय. एका अशाच प्रमोशनल इव्हेंटमध्ये अण्णाला जावयाच्या म्हणजे किक्रेटपटू के. एल. राहुलच्या खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला.खरं तर अण्णाला क्रिकेटचा मोठा चाहता आहे. अगदी अभिनेता नसतो तर मी क्रिकेटपटूच झालो असतो, असं अण्णाने अनेक मुलाखतीत सांगितलं आहे. सुनील शेट्टीचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्नं अधुरं राहिलं. पण त्याचा जावई मात्र क्रिकेटपटू आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अण्णाचा जावई के. एल. राहुल ( KL Rahul) खराब फॉर्ममुळे चर्चेत आहेत. सततच्या खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी ठरतोय. सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत अण्णाला जावयाच्या या खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारला गेला.

काय म्हणाला अण्णा...?राहुलच्या आयुष्याचा हा एक टप्पा आहे आणि तो सुद्धा निघून जाईल. मी एका तरूण मुलाला कठीण काळातून जाताना पाहतोय. पण तो फायटर आहे. तो मेहनत करायला, संकटाचा सामना करायला तयार आहे आणि मी किंवा तो काय बोलणार. त्याची बॅटचं उत्तर देणार. हा काही सिनेमा नाही. त्याला स्वत:लाच मैदानात उतरायचं आहे आणि प्रत्येक चेंडूचा सामना करत आपल्यातील बेस्ट द्यायचं आहे. तो हे करणार, हे मात्र मला चांगलं ठाऊक आहे, असं अण्णा म्हणाला.

मी काय सल्ला देणार? हे काही गल्ली क्रिकेट नाही...राहुल मैदानावर खराब कामगिरी करतो तेव्हा त्याला घरी त्याबद्दल चर्चा करायला आवडत नाही. मैदानातवर तो अपयशी ठरतो, तेव्हा आम्ही त्याच्या अपयश किंवा खराब खेळावर चर्चा करत नाही. आम्हाला फक्त एवढंच ठाऊक आहे की, तो एक योद्धा आहे. अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. आम्ही त्याच्याशी जगभरातील गोष्टींबद्दल बोलतो, जेणेकरून तो खराब कामगिरीबद्दल विचार करणार नाही. खरं सांगायचं तर मी केएल राहुलला क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवू शकत नाही. कारण तो देशासाठी खेळतोय. तो काही गल्लीत क्रिकेट खेळत नाही, ज्याला मी क्रिकेट खेळण्याचा सल्ला देईन. तो देशासाठी खेळतो आणि तो त्या खेळातला मास्टर आहे, असंही अण्णा म्हणाला.

अण्णाची लेक अथिया शेट्टीने याचवर्षी लग्नगाठ बांधली. त्याआधी चार वर्षे अथिया व केएल राहुल रिलेशनशिपमध्ये होते. 

टॅग्स :सुनील शेट्टीलोकेश राहुलअथिया शेट्टी बॉलिवूड