Join us  

Sulochana Latkar Death: सुलोचना दीदींच्या निधनावर पीएम मोदींपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत अनेक सेलिब्रेटींनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 10:48 AM

आपल्या कसदार अभिनयानं अनेक दशके मनोरंजन जगत गाजवणाऱ्या सुलोचनादीदींना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

मराठी सिनेसृष्टीत सुलोचनादीदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं रविवारी  निधन झालं. त्या ९४व्या वर्षांच्या होत्या. दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ८ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्या कसदार अभिनयानं अनेक दशके मनोरंजन जगत गाजवणाऱ्या सुलोचनादीदींना विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुलोचनादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

सुलोचना यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मोदींपासून ते सर्व सेलिब्रिटी आणि चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करतायेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलोचना दीदींच्या निधनावर शोक व्यक्त करत ट्विट केलंय, सुलोचनाजींच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अविस्मरणीय अभिनयाने आपली संस्कृती समृद्ध केली आणि पिढ्यानपिढ्या लोकांचं त्यांना प्रेम मिळालं. त्यांच्या कलाकृतींमधून त्या कायम जिवंत राहातील. त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना. ओम शांती."

माधुरी दीक्षितने ट्विट करत लिहिले, "सुलोचना ताई चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडक्या आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. माझा आवडता चित्रपट नेहमीच 'संगत ऐका' राहिल. प्रत्येक चित्रपटातील त्यांचा अभिनय संस्मरणीय होता.मी आमच्यातील संवाद मीस करेन. भारतीय चित्रपटसृष्टीतील तुमचे योगदान सदैव स्मरणात राहील.

रितेश देशमुखनेही सुलोचना दीदींच्या यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. रितेशने ट्विट करत लिहिले, "सुलोचना दिदी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठीसह हिंदी चित्रसृष्टीतील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महान अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.''

टॅग्स :सुलोचना दीदीनरेंद्र मोदीमाधुरी दिक्षित