महाठग सुकेश चंद्रशेखरने व्हॅलेंटाईन डे निमित्त बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला एक रोमँटिक पत्र लिहिलं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने हे खास पत्र लिहिलं. सुकेशने आपल्या पत्रात जॅकलीनला 'बेबी गर्ल' म्हटलं आणि प्रेमही व्यक्त केलं. जॅकलीनवर खूप प्रेम करतो आणि तिला एक प्रायव्हेट जेट भेट देऊ इच्छितो, जेणेकरून अभिनेत्रीला शूटिंगसाठी कुठेही जाण्यात कोणतीही अडचण येऊ नये असंही म्हटलं आहे.
न्यूज१८ इंग्लिशमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, सुकेश चंद्रशेखर यांनी जॅकलीनला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "बेबी गर्ल, सर्वप्रथम, तुला व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. बेबी, या वर्षाची सुरुवात आपल्यासाठी खूप सकारात्मकता आणि खूप खास गोष्टींनी झाली आहे आणि हा व्हॅलेंटाईन डे देखील खूप खास आहे कारण तो आपल्या आयुष्यातील उर्वरित व्हॅलेंटाईन डे एकत्र घालवण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे."
"मला सांगायचे आहे की जॅकी, मी तुझ्यावर खूप खूप जास्त प्रेम करतो. तू जगातील सर्वोत्तम व्हॅलेंटाईन आहेस, मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो." सुकेशने पुढे सांगितलं की, तो व्हॅलेंटाईन डेला जॅकलीनला एक प्रायव्हेट जेट भेट देत आहे. त्याने सांगितलं की, जेटवर जॅकलिनच्या नावाची सुरुवातीची अक्षरे लिहिलेली आहेत. एवढेच नाही तर त्याने असा दावाही केला की जेटचा रेजिस्ट्रेशन नंबर देखील जॅकलिनची जन्मतारीख आहे.
"बेबी, तू नेहमीच कामाच्या निमित्ताने शूटिंगसाठी जगभर प्रवास करतेस, आता या जेटमुळे तुझा प्रवास खूप सोपा आणि सोयीस्कर होईल. या व्हॅलेंटाईनला माझी एकच इच्छा आहे, जर माझा पुनर्जन्म झाला तर मला तुझं हृदय म्हणून जन्म घ्यायचा आहे जेणेकरून मी तुझ्या आत धडधडत राहू शकेन. तू माझ्या आयुष्यात माझी व्हॅलेंटाईन म्हणून आल्यामुळे मी या पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती झालो आहे" असं सुकेशने आपल्या पत्रात म्हटलं आहे.
२०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीतील मंडोली जेलमध्ये आहे. तो जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अभिनेत्रीने प्रत्येक वेळी सुकेशसोबतच्या कोणत्याही नात्याला नकार दिला आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये, जॅकलिन फर्नांडिसने सुकेशवर तिची इमेज खराब करण्यासाठी मीडियाचा वापर केल्याचा आरोपही केला. तिने सुकेशने तिचा छळ केल्याचा आरोपही केला होता.