Join us

'द आर्चीज' नाही तर या फिल्ममधून शाहरुखची लेक सुहानाने केलं होतं पदार्पण, तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 13:46 IST

सुहानाने जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण, अभिनयातील पदार्पणाचा हा तिचा पहिला सिनेमा नाही.

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानची लेक सुहानाचा आज वाढदिवस आहे. सुहाना आज तिचा २४वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सुहानाने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. सध्या सुहाना बॉलिवूडमध्ये तिचं नशीब आजमावत आहे. सुहानाने जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण, अभिनयातील पदार्पणाचा हा तिचा पहिला सिनेमा नाही. याआधी तिची एक शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली होती, हे तुम्हाला माहीत आहे का? 

'द आर्चीज' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. सुहानाबरोबर या सिनेमातून अनेक स्टारकिड्स दिसले होते. पण, या सिनेमाला प्रेक्षकांकडून हवी तशी दाद मिळाली नाही. या सिनेमातून सुहानाने बॉलिवूडमध्ये जरी पदार्पण केलं असलं तरी याआधीच तिने अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. सुहानाने कॉलेजमध्ये असतानाच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. एका शॉर्ट फिल्ममधून तिने अभिनयाची झलक दाखवली होती. 'द ग्रेट पार्ट ऑफ ब्लू' या शॉर्ट फिल्ममध्ये सुहाना दिसली होती. 

सुहानाची ही शॉर्ट फिल्म ब्रेकअपच्या वाटेवर असलेल्या एका गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच्या नात्यावर आधारित आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये सुहाना विना मेकअप लूकमध्ये दिसत आहे.  सुहानाची ही शॉर्ट फिल्म २०१९मध्ये प्रदर्शित झाली होती. या शॉर्ट फिल्मला २.४ मिलियन व्ह्यूज आहेत. ही शॉर्ट फिल्म युट्यूबर उपलब्ध आहे. 

'द आर्चीज' नंतर सुहाना नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून ती शाहरुख खानबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याचं बोललं जात आहे. 'किंग' असं सिनेमाचं नाव असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खानसेलिब्रिटी