Join us  

'मराठी माणसाकडे स्वाभिमान नाही' ; दिग्पाल लांजेकरांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 10:45 AM

Digpal lanjekar: लवकरच त्यांचा 'सुभेदार' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (digpal lanjekar) सध्या त्यांच्या 'सुभेदार' या आगामी सिनेमामुळे चर्चेत येत आहेत. श्री शिवराज अष्टकातील हा पाचवा सिनेमा असून यापूर्वी 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' ,'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' हे चार सिनेमा प्रदर्शित झाले आहेत. येत्या १८ ऑगस्ट रोजी सुभेदार हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्यामुळे दिग्पाल लांजेकर त्याचं जोरदार प्रमोशन करत आहेत. या निमित्ताने त्यांनी अलिकडेच एक मुलाखत दिली.

दिग्पाल लांजेकर यांनी एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांन स्वाभिमान आणि अभिमान या संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आलं. त्याचं उत्तर देत त्यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमान व अभिमान याविषयी भाष्य केलं. इतकंच नाही तर मराठी माणसाकडे या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे त्याची खंत वाटत असल्याचंही ते म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले दिग्पाल लांजेकर?

"अभिमानाचा दुराभिमान होऊ नये. स्वाभिमान असायला हवा.मी मराठी सिनेमा पहिल्यांदाच पाहणार का तर हो कारण, तो स्वाभिमानाचा भाग आहे. ती माझी भाषा आहे. आपल्याला मराठी संस्कृतीचा अभिमान असायला पाहिजे. मराठी भाषा छानच आहे. पण, हे वाईट आहे, ते वाईट आहे असं म्हणत दुसऱ्या भाषेचा दुराभिमान नसायला हवा. कारण, मग त्यावेळी कोणी मराठी वाईट आहे असं म्हटलं तर मी हे ऐकून घेणार नाही", असं दिग्पाल लांजेकर म्हणाले.

पुढे ते म्हणतात, " माणसाकडे अभिमान आणि स्वाभिमान या दोन्ही गोष्टी असायला हव्यात. पण, दुर्दैवाने मराठी माणसाकडे त्याच नाहीत. या गोष्टीचं फार वाईट वाटतं" दरम्यान, दिग्पाल लांजेकर यांचा सुभेदार हा सिनेमा येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. तर, त्याच्यासोबत मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीदेखील झळकणार आहे. 

टॅग्स :दिग्पाल लांजेकरसेलिब्रिटीसिनेमामृणाल कुलकर्णीशिवानी रांगोळेचिन्मय मांडलेकर