Join us  

अनोळखी व्यक्तीने भरलं सोनू सूदच्या जेवणाचं बील; कारण वाचून भारावून गेला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 3:47 PM

Sonu sood: एका अनोळखी व्यक्तीने सोनू सूदला कशाचाही थांगपत्ता लागू न देता त्याच्या जेवणाचं बील भरलं. सोबतच त्याने हे कशासाठी केलं ते सुद्धा एका चिठ्ठीच्या माध्यमातून या व्यक्तीने सांगितलं.

करोना काळात अनेकांसाठी देवदूत ठरलेला बॉलिवूडचा खलनायक म्हणजे सोनू सूद (sonu sood) . रुपेरी पडद्यावर सोनू सूदने अनेक खलनायिकी भूमिका साकारल्या. मात्र, खऱ्या आयुष्यात त्याने गरजूंसाठी हिरोसारखं काम केलं. त्यामुळेच आज सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत त्याच्या नावाची चर्चा होत असते. परंतु, सध्या त्याच्या बाबतीत असा प्रसंग घडला आहे ज्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. एका रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या सोनू सूदचं बील चक्क एका अनोळखी व्यक्तीने भरलं. इतकंच नाही तर त्याने सोबत जी चिठ्ठी लिहिली ती भारावून टाकणारी होती.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सोनू सूदने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक त्याच्या नावाने लिहिलेली चिठ्ठी दिसून येत आहे. ही चिठ्ठी एका अनोळखी व्यक्तीने लिहिली असून त्याने सोनू सूदच्या जेवणाचं बील सुद्धा भरलं. विशेष म्हणजे या व्यक्तीने असं का केलं असेल? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, त्यामागे एक खास कारण असल्याचं समोर आलं आहे.

"मला माहित नाही हे कोणी केलंय. पण एका व्यक्तीने आमच्या जेवणाचं सगळं बील भरलं. आणि, सोबत एक चिठ्ठी सुद्धा ठेवली. त्यांचं हे वागणं अगदीच मनस्पर्शून गेलं आहे", असं कॅप्शन देत सोनू सूदने ही पोस्ट शेअर केली आहे. सोबतच या पोस्टमध्ये त्याने अनोळखी व्यक्तीने त्याच्या नावाने ठेवलेल्या चिठ्ठीचा फोटोही शेअर केला आहे. या चिठ्ठीमध्ये, "तुम्ही देशासाठी जी काही चांगली काम केली, त्या सगळ्यासाठी मनापासून धन्यवाद", असं लिहिलं आहे.

दरम्यान, सोनू सूदने ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. अनेक जणांनी सोनू सूदचं कौतुक केलं. 'तू देशातील नागरिकांसाठी जे केलं आहे त्याचे उपकार कोणी परत फेडू शकणार नाही', असंही अनेकांनी म्हटलं आहे.

टॅग्स :सोनू सूदबॉलिवूडसेलिब्रिटीकोरोना वायरस बातम्या