तलाव - मराठी चित्रपट, राज चिंचणकरआजचा मराठी चित्रपट एकीकडे विविध विषयांना गवसणी घालताना दिसून येतो; मात्र त्याचवेळी काही चित्रपट मात्र चिरपरिचित गोष्टींतून बाहेर पडताना दिसत नाहीत. ‘तलाव’ हा चित्रपटही दुसऱ्या पठडीत मोडतो. जुन्या पद्धतीच्या चित्रपटांचा बाज स्वीकारलेल्या या चित्रपटात साहजिकच नावीन्याचा अभाव आहे. या कथेला थोडाफार आधुनिक ‘टच’ देण्याचा प्रयत्न केला असला, तरी जुन्या वळणाची ओळखीची कहाणीच हा चित्रपट सांगतो. परिणामी, पाण्याने तुडुंब भरलेल्या तलावाचे दर्शन होण्याऐवजी, केवळ त्यातल्या साचलेल्या पाण्याचा खळखळाटच ऐकू येत राहतो.एका गावातल्या सिद्धू या तरुणाची ही गोष्ट आहे. गावात नवीन आलेल्या मास्तरांची मुलगी कादंबरी हिच्या सिद्धू प्रथमदर्शनीच प्रेमात पडतो. तीसुद्धा त्याला होकार देते. मात्र गावातल्या पाटीलकीचा वारसा सांगणाऱ्या धनंजय या खलनायकाची दृष्ट त्या दोघांना लागते. इथून नायक व खलनायकाचा सामना सुरू होतो. प्रेमभावना आणि सूड यांचे मिश्रण साधत ही कथा शेवटाकडे येऊन ठेपते.जयभीम कांबळे यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात नवीन काय ते शोधावे लागते. अशा प्रकारच्या कथा आतापर्यंत मराठी पडद्याने अनेकदा पाहिलेल्या आहेत. ही कथा उत्कंठा वाढवत नाही; कारण पुढे काय होणार याचा अंदाज आधीच येत राहतो.चित्रपटाची कथा घडते ती गावातल्या तलावाच्या भोवती; परंतु त्या तलावाचा योग्य तो उपयोग करून घेण्यात आलेला नाही. वास्तविक, तलावाला केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती अजून भक्कम कथा रचता आली असती. यातला तलावही लक्षवेधी नसल्याने, हा केंद्रबिंदूसुद्धा डळमळीत झाला आहे. चित्रपटात क्लोजअप्सचा केलेला अतिवापर त्रासदायक आहे. नवनीत फोंडके या युवा निर्मात्याने या चित्रपटाद्वारे या क्षेत्रात पाऊल टाकले असले, तरी चित्रपटाच्या आशयाच्या अनुषंगाने ते अजून भक्कम असायला हवे होते. चित्रपटाची गाणी मात्र ठीक झाली आहेत. त्या दृष्टीने गीतकार राहुल काळे आणि संगीतकार आशिष आंबेकर यांचे काम चांगले आहे. सौरभ गोखले (सिद्धू) याला या चित्रपटात फूल टू बॅटिंग करायला वाव मिळाला आहे आणि त्याने त्याचा योग्य उपयोग करून घेतला आहे. प्रियांका राऊत (कादंबरी) हिने तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेत यथाशक्ती रंग भरण्याचे काम तेवढे केले आहे. संजय खापरे (धनंजय) यांनी खलनायक रंगवताना अनुभवाच्या जोरावर दणदणीत कामगिरी केली आहे. पण त्यामुळे अनेकदा तर खलनायकच चित्रपटात भारी पडल्याचे जाणवत राहते. नवनीत फोंडके, ऐश्वर्या बडदे, वर्षा पवार, हृषीकेश वांबुरकर आदी कलावंतांनी या तलावात शक्य तितके पाणी भरण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी या तलावाविषयी फार काही सांगण्याची आवश्यकता नाही.
साचलेल्या पाण्याचा खळखळाट...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2017 01:26 IST