तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे 'ज्युनियर'. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक राधा कृष्ण यांनी केलं आहे. याचा प्री-रिलीज कार्यक्रम नुकताच हैदराबादमध्ये पार पडला. या खास कार्यक्रमाला दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक एस.एस. राजमौली, अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि लोकप्रिय अभिनेत्री श्रीलीला उपस्थित होत्या.
ज्युनियर हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कन्नड भाषेत बनवला आहे. या चित्रपटात श्रीलीला मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट राधा कृष्ण यांनी दिग्दर्शित केला आहे. विशेष म्हणजे, या सिनेमातून जिनिलिया तेलगू आणि कन्नड सिनेमांमध्ये कमबॅक करतेय. या कार्यक्रमात बोलताना एस.एस. राजमौली म्हणाले, "'ज्युनियर' चित्रपटाचं १००० स्क्रीनवर रिलीज होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. यावरून प्रेक्षकांचा उत्साह स्पष्टपणे दिसून येतो".
राजमौली यांनी पुढे जिनिलियाचं विशेष कौतुक करत म्हटलं, "ती नेहमीसारखीच सुंदर आणि सदाबहार आहे". त्यांच्या या विधानावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. इतकंच नाही, तर राजामौली यांनी श्रीलीला भविष्यातील सुपरस्टार म्हटलं आणि तिच्या नृत्याचं कौतुक केलं.
जिनिलीया देशमुखचा चाहता वर्ग मोठा आहे. जिनिलियाचा सहज सुंदर अभिनय, तिची निरागसता या गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावतात. जिनिलिया गेल्या १० वर्षात इंडस्ट्रीपासून दूर होती. दोन मुलांचा सांभाळ आणि एक गृहिणी म्हणून जबाबदारी निभावली. आता मुलं मोठी झाल्यानंतर जिनिलिया पुन्हा इंडस्ट्रीत कमबॅक करतेय. तिचा अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मोठ्या ब्रेकनंतर जिनिलिया हिला मोठ्या पडद्यावर पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद होतोय.