Join us  

प्रत्येक तिकिटामागे ५ रुपये! राम मंदिरासाठी 'हनुमान'च्या टीमने दान केले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 5:26 PM

'हनुमान' या सिनेमाच्या टीमने कमाईचा एक मोठा हिस्सा राम मंदिर निर्माणासाठी दान केला आहे. 

बॉक्स ऑफिसवर 'हनुमान' या चित्रपटाचा बोलबाला पहायला मिळतोय. साऊथ सुपरस्टार तेजा सज्जाची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट जबरदस्त कमाई करतोय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रोज नवनवे रेकॉर्ड तोडत असून कोट्यवधींची कमाई करत आहे. यातच निर्मात्यांचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. कारण, 'हनुमान' या सिनेमाच्या टीमने सिनेमाच्या कमाईचा एक मोठा हिस्सा राम मंदिर निर्माणासाठी दान केला आहे. 

प्रशांत वर्माचा  'हनुमान' 12  जानेवारीला प्रदर्शित झाला. सिनेमात अभिनेता तेजा सज्जा, वरलक्ष्मी सरथकुमार, अमृता अय्यर आणि विनय राय यांच्या मुख्य भूमिका आहेत. अयोध्याराम मंदिरासाठी सिनेमाच्या विकल्या गेलेल्या प्रत्येक तिकिटावर 5 रुपये देण्याचा निर्णय निर्मात्यानी घेतला होता. त्यानुसार आपलं आश्वासन पुर्ण करत चित्रपटाच्या टीमने अयोध्या राम मंदिरासाठी 2.6 कोटी (₹ 2,66,41,055) रुपये दान केले आहेत. ही माहिती 'हनुमान'च्या टीमने पत्रकारांना दिली असून एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे. 

चित्रपटाने जगभरात 150 कोटींचा टप्पा ओलांडला आणि आठवड्याच्या शेवटीही  सिनेमानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान विकल्या गेलेल्या 2 लाख 97 हजार 162 तिकिटांपैकी 14 लाख 85 हजार 810 चा चेक त्यांनी आधीच दान केला आहे. आता ते विकल्या गेलेल्या 53 लाख 28 हजार 211 तिकिटांतून 2 कोटी 66 लाख 41 हजार 55 रुपयांची देणगी देणार आहेत. 

आयोध्येत उद्या (22 जानेवारी) रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या थाटामाटात होणार आहे. देशभरात सध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरु आहे. रामललाच्या आगमनामुळे अवघा भारत देश राममय झाला आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी राजकारणी आणि सेलिब्रिटीज अयोध्येत पोहोचू लागले आहेत.  

टॅग्स :राम मंदिरसेलिब्रिटीTollywoodचिरंजीवीअयोध्या