Join us

प्रभास शुटिंगदरम्यान जखमी, दुखापतीमुळे सोडावी लागली मोठी संधी; चाहत्यांची मागितली माफी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:29 IST

अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

Prabhas Injured  : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील 'रेबल' स्टार प्रभास दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. मात्र, अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. शूटिंगदरम्यान प्रभास जखमी झाला आहे. अभिनेता सध्या त्याच्या आगामी 'फौजी' चित्रपटासाठी  शूटिंग करत आहे. अ‍ॅक्शन सीन शूट करत असताना हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. दुखापत झाल्याने प्रभास जपानमध्ये 'कल्की 2898 एडी'च्या प्रमोशनसाठी पोहोचू शकणार नाही.

प्रभास हा जपानमध्ये 'कल्की 2898 एडी'च्या प्रमोशनसाठी जाणार होता. पण, आता जखमी झाल्याने त्याला त्याचा प्लॉन रद्द करावा लागला आहे. यासाठी त्याने जपानमधील चाहत्यांची माफी मागितली.  'कल्की 2898 एडी' सिनेमा 3 जानेवारी 2025 रोजी जपानमध्ये रिलीज होणार आहे.

प्रभासनं एक निवदेन जारी करत जपानमधी चाहत्यांची माफी मागितली आहे. अभिनेत्याने लिहिलं की, 'माझ्यावर आणि माझ्या कामाला नेहमीच इतके प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. मी खूप दिवसांपासून जपानला जाण्याची वाट पाहत होतो. मात्र, मला सांगायला खूप वाईट वाटतं की शूटिंगदरम्यान मला दुखापत झाली आहे. त्यामुळे आता मी तिकडे येऊ शकत नाही. 'कल्की 2898 एडी' 3 जानेवारीला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. मला आशा आहे की आपण लवकरच भेटू".

दरम्यान, प्रभासचा  'फौजी'  हा चित्रपट सुभाषचंद्र बोस यांच्या काळावर आधारित आहे.  प्रभास हा स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश आर्मीतील सैनिकाची भूमिका साकारणार आहे.  या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि जया प्रदा यांच्याही भूमिका आहेत.  एकूणच प्रभासच्या चाहत्यांना पुन्हा एकदा ऐतिहासिक विषयावरील सिनेमा पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. सध्या अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. 

टॅग्स :प्रभाससेलिब्रिटी