Join us  

KGF स्टार यशच्या आणखी एका चाहत्याचा मृत्यू, बाईकवर अभिनेत्याचा पाठलाग करताना झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 3:08 PM

चाहत्यांच्या मृत्यूने कन्नड अभिनेता यश अस्वस्थ

केजीएफ (KGF) स्टार अभिनेता यश (Yash Gowda) सध्या प्रचंड धक्क्यात आहे. ८ जानेवारी रोजी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्या तीन चाहत्यांचा मृत्यू झाला. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या वाढदिवसाला बॅनर लावत असतानाच विजेचा झटका लागल्याने तीन जण मृत पावले. तर आता यशच्या आणखी एका चाहत्याचा जीव गेला आहे. यशच्या गाडीचा पाठलाग करत असतानाच झालेल्या अपघातात चाहत्याचा मृत्यू झाला आहे. 

ही घटना सोमवारी 8 जानेवारी रोजी घडली. हिंदुस्तान टाईम्स रिपोर्टनुसार, कर्नाटकातील गडग येथील मुलगुंड नाक्यावर यशच्या गाडीचा पाठलाग करताना २२ वर्षीय निखिल गौडाची बाईक पोलिसांच्या गाडीला धडकली. या अपघातात निखिल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा यश आपल्या तीन चाहत्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबाला भेटून परत निघाला होता. तेव्हा रस्त्यात दुर्देवाने त्याच्या आणखी एका चाहत्याने प्राण गमावले. या प्रकारामुळे यश खूपच अस्वस्थ झाला आहे. 

यशचा हा चाहता निखिल गौडा गडग तालुक्यातील बिंकादकट्टी गावात राहत होता. अगाडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात तो शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याचे आईवडील डॉक्टर आहेत. नुकतंच निखिलला एका खाजगी कंपनीत नोकरीची ऑफर मिळाली होती. 

यशच्या वाढदिवसाला चाहत्यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच यशने त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. तसंच त्यांना आर्थिक मदतही केली. यानंतर यशने सर्वच चाहत्यांना एक आव्हान केले. तो म्हणाला, 'जर तुमचं माझ्यावर मनापासून प्रेम असेल तर जिथे आहात तिथूनच मला शुभेच्छा द्या. अशा प्रकारच्या दु:खद घटनांमुळे मला माझ्याच वाढदिवसाची भीती वाटत आहे. कृपया स्वत:चा जीव धोक्यात घालून माझ्यावरचं प्रेम दाखवू नका. माझा पाठलाग करणं, बॅनर लावणं आणि जीव धोक्यात घालून सेल्फी घेणं हे करु नका. माझी इच्छा आहे की माझे चाहते आयुष्यात माझ्यासोबतच पुढे जात राहो.'

टॅग्स :यशअपघातTollywood