Join us

घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:26 IST

Kantara: Chapter 1 : या वर्षातील बहुप्रतिक्षित 'कांतारा चॅप्टर १' चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

या वर्षातील बहुप्रतिक्षित 'कांतारा चॅप्टर १' (Kantara: Chapter 1 Movie) चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटात भव्य सेट पाहायला मिळाले असले तरी, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा चित्रपट कोडाचाद्रीच्या जंगलात आणि दगडी रस्त्यांवर चित्रीत झाला आहे.

'कांतारा' या शब्दाचा अर्थच 'रहस्यमय जंगल' आहे. या चित्रपटाचं शूटिंगही कर्नाटकमधील घनदाट जंगलात करण्यात आलं आहे. जर तुम्हाला चित्रपट पाहताना तिथली लोकेशन्स खूप आवडली असतील, तर तुम्ही तिथे फिरायलाही जाऊ शकता. घनदाट जंगलांपासून ते रिसॉर्ट्स आणि मंदिरांपर्यंत... तुम्ही 'कांतारा'चा प्रवास अनुभवू शकता.

कुंदापूर कुंदापूर हे कर्नाटकमधील उडुपी जिल्ह्यातील समुद्रकिनारा आणि घनदाट हिरव्यागार जंगलांच्यामध्ये वसलेले एक छोटे शहर आहे. इथल्याच जंगलांमध्ये 'कांतारा चॅप्टर १' साठी भव्य सेट उभारण्यात आले होते. जिथे कदंब साम्राज्याची भव्यता दर्शवण्यासाठी तात्पुरती शिबिरेदेखील तयार केली गेली होती, ज्याभोवती संपूर्ण चित्रपट फिरतो.

मूडुगल्लू केशवनाथेश्वर मंदिर, मूडुगल्लू हे कर्नाटकमधील उडुपी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे. हे मंदिर केराडी गावाजवळ मूडुगल्लू येथे आहे. हे मंदिर एका नैसर्गिक गुहेच्या आत बनलेले आहे. ज्यात दोन शिवलिंग आहेत – एक स्वयंभू आणि दुसरे मानवनिर्मित. मंदिराच्या आत जाण्यासाठी गुडघ्यापर्यंत पाण्यातून चालावे लागते, जिथे लहान मासे आणि सापही दिसतात. 'कांतारा' चित्रपटाचं काही चित्रीकरण इथेही करण्यात आलं आहे. जर तुम्हाला रिलमधून रिअल लाईफमध्ये जायचं असेल, तर तुम्ही हे ठिकाण नक्की एक्स्प्लोअर करू शकता.

मणि धरण 'कांतारा: चॅप्टर १' मध्ये मणि धरणाच्या बॅकवॉटरचा परिसरही पाहता येतो, जो चित्रपटाच्या दृश्यांना भव्यता देतो. पश्चिम घाटात नेत्रावती नदीवर बांधलेले मणि धरण, हिरवीगार जंगलं, धुक्याने भरलेल्या दऱ्या आणि लपलेल्या धबधब्यांनी वेढलेले आहे. चित्रपटात दाखवलेली येथील दृश्ये तुम्हाला अनुभवायची असतील, तर तुम्ही इथे अवश्य भेट द्या.

सकलेशपूर हिल स्टेशन कर्नाटकमधील पश्चिम घाटात स्थित असलेल्या सकलेशपूर हिल स्टेशनमध्ये चित्रपटातील मुख्य युद्ध दृश्ये चित्रीत करण्यात आली आहेत. चहा आणि कॉफीच्या मळ्यांनी तसेच वळणावळणाच्या रस्त्यांनी वेढलेले हे हिल स्टेशन फिरण्यासाठी उत्तम ठिकाणांपैकी एक आहे. चित्रपटात या ठिकाणाला खूप भव्यतेने सादर केले गेले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Kantara: Chapter 1' Filmed in Dense Forests: Scenic Locations Revealed

Web Summary : 'Kantara: Chapter 1', a visual spectacle, was filmed in Karnataka's dense forests. Explore Kundapur's shores, Moodugallu's temple, Mani Dam's beauty, and Sakleshpur's hills, experiencing the film's stunning backdrops firsthand.
टॅग्स :कांताराऋषभ शेट्टी